फ्रंटलाईनवर पोलीस की नाश्त्याचा ठेला?; शताब्दी चौकातील ‘चेक पॉइंट’च झाला बॅकलाईनवर!

– पोलिसांचा तंबू रस्त्यालगत उभारण्याऐवजी नाश्त्याच्या ठेल्याच्या मागे; ‘दिसणाऱ्या पोलिसिंग’ उद्देशाला खीळ?

The Exposer
नागपूर : शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ‘फिक्स पॉइंट’ अर्थात चेक पोस्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना पोलिसांची उपस्थिती स्पष्टपणे दिसावी, संवेदनशील ठिकाणी तातडीने प्रतिसाद मिळावा आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे. मात्र, शताब्दी चौकातील चेक पॉइंटची जागाच या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत असल्याची चर्चा आहे.

सोमवारी शताब्दी चौकात पोलिसांसाठी वॉटरप्रूफ प्लास्टिकचा तंबू उभारण्यात आला. मात्र, चौकाच्या फ्रंटलाईनवर, रस्त्यालगत आणि नागरिकांना सहज नजरेस पडेल अशा ठिकाणी तंबू उभारण्याऐवजी तो एका नाश्त्याच्या ठेल्याच्या मागील बाजूस उभारण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना ना पोलीस तंबू सहज दिसतो, ना तेथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी.

मग ‘दिसणाऱ्या पोलिसिंग’चा उद्देश साधणार कसा?

पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेनुसार शहरातील प्रमुख चौकांवर पोलिसांची दृश्यमान आणि प्रभावी उपस्थिती निर्माण होणे अपेक्षित आहे. मात्र, चेक पॉइंटच जर नागरिकांच्या नजरेआड राहिला, तर पोलिसांच्या उपस्थितीचा वचक निर्माण होणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.

काही वर्षांपूर्वी याच शताब्दी चौकात पोलीस तंबू उभारण्यात आला होता. त्यावेळी तंबू चौकाच्या फ्रंटलाईनवर, रस्त्याच्या कडेला आणि सहज दिसेल अशा ठिकाणी उभारण्यात आला होता. त्यामुळे चौकातून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पोलिसांची उपस्थिती स्पष्टपणे जाणवत होती.

यावेळी ठेला ‘फ्रंटलाईन’वर, पोलीस ‘बॅकलाईन’वर!

सध्याच्या व्यवस्थेत मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या भागात नाश्त्याचा ठेला प्रथमदर्शनी दिसतो आणि त्याच्या मागे पोलिसांचा तंबू असल्याने चेक पॉइंटची दृश्यता कमी झाली आहे. परिणामी, पोलिसांसाठी उभारलेला तंबूच झाकोळला जात असल्याचे चित्र आहे. चेक पॉइंटचा उद्देश ‘दिसणारी पोलिसिंग’ असेल, तर त्याची जागा निवडतानाच फ्रंटलाईनला प्राधान्य मिळायला नको का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

तंबू उभारला; पण नेमका ‘पॉइंट’ कुठे?

शहरात प्रत्येक पोलिस ठाण्यात पाच-पाच फिक्स पॉइंट उभारून पोलिसिंग अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न होत असताना, चेक पॉइंटच्या जागेची निवडही तितकीच महत्त्वाची आहे. पोलिसांचा तंबू आणि तेथील बंदोबस्तावरील कर्मचारी नागरिकांना लांबूनही स्पष्टपणे दिसतील, अशा ठिकाणी ते उभारले गेले तरच या उपक्रमाचा अपेक्षित परिणाम साधता येईल. अन्यथा तंबू पोलिसांचा आणि फ्रंटलाईन मात्र ठेल्याची—अशी विसंगत परिस्थिती निर्माण होऊन ‘फिक्स पॉइंट’च्या संकल्पनेलाच धक्का बसण्याची शक्यता आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More