– पाचपावली शांतिनगरात वाहनचोरी अन् रात्रीच्या घरफोड्यांतून कमाई; दोन आरोपी फरार
The Exposer
नागपूर : शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत पाचपावली आणि शांतिनगर परिसरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. टोळीचा सरगणा जगदीश विजय गोखले (२७) याच्यासह सात आरोपींविरुद्ध मकोकाच्या कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
यातील जगदीश गोखले आणि राहुल शिरसाट हे दोघे फरार आहेत. पोलिसांच्या तपासात या टोळीचा गुन्हेगारी कारभार उघडकीस आला. वाहनचोरी, रात्रीच्या घरफोड्या, मारामारी, शस्त्र कायद्याचे उल्लंघन, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये या टोळीतील सदस्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. मागील पाच वर्षांत विविध पोलीस ठाण्यांमध्ये टोळीतील आरोपींविरुद्ध तब्बल २३ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोखलेच्या नेतृत्वाखाली टोळी सक्रिय
पोलिसांच्या माहितीनुसार, जगदीश गोखले याच्या नेतृत्वाखाली ही टोळी संघटितपणे गुन्हे करत होती. वाहनांची चोरी करणे तसेच रात्रीच्या वेळी घरांमध्ये घुसून चोरी करणे, अशा मार्गाने आर्थिक फायदा मिळवला जात होता. वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी मकोका कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आरोपींवर मकोकाचा शिक्का बसला आहे.
या सात आरोपींवर मकोका
मकोका कारवाई झालेल्या आरोपींमध्ये जगदीश विजय गोखले, अंकित ऊर्फ बिट्टू सूर्यकांत चावरे (२७), नचिकेत ऊर्फ छोटू भांजा केशव झाडे (१९), मयूर ऊर्फ दात्या किशोर आदित्य (२२), राकेश नारायण भुरे (१९), राहुल रामअवतार शिरसाट (२३) आणि चंद्रशेखर ऊर्फ चंदू सदाशिव पौनीकर (२०) यांचा समावेश आहे. यापैकी जगदीश गोखले आणि राहुल शिरसाट हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
संघटित गुन्हेगारीला पोलिसांचा इशारा
गंभीर गुन्ह्यांची पुनरावृत्ती करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाईचा पोलिसांचा धडाका सुरूच आहे. या कारवाईतून संघटित गुन्हेगारीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे आणि विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
Author: संतोष तायडे
संपादक










