– जानकीनगर येथे सकाळी घडली खळबळजनक घटना
The Exposer
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी नगर येथे आज सकाळी खळबळजनक घटना घडली. माजी आमदारांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीने शेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी व मुलाच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेत त्याला खाली उतरविले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती पत्नी व मुलासह जानकी नगर परिसरातील या घरात भाड्याने राहत होती. शेजारील भाडेकरूने नुकतीच आपली खोली रिकामी केली होती. याच रिकाम्या खोलीत संबंधित व्यक्तीने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.
घटना लक्षात येताच पत्नी व मुलाने आरडाओरड करून तातडीने त्याला खाली उतरविले. दरम्यान, पत्नी व पुतण्याने वेळ न दवडता त्याला ऑटोमधून रुग्णालयात नेले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून प्राथमिक चौकशी सुरू केली. गळफास घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.
संबंधित व्यक्ती प्रायव्हेट काम करीत असून त्याची पत्नी घरकाम करते. तो नुकताच गावाहून परतला होता. गावाहून परतल्यानंतर तो काही दिवसांपासून तणावात असल्याचे शेजाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
या घटनेमुळे जानकी नगर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. हुडकेश्वर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत असून संबंधित व्यक्तीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Author: संतोष तायडे
संपादक










