– 1.68 लाखांची लाच मागितल्याचा आरोप; हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नागपुरात कारवाई
The Exposer
नागपूर : RTOकडून वाहनांवर कारवाई होऊ नये, यासाठी वाहनांचे क्रमांक कथितपणे RTOच्या ‘लिस्ट’मध्ये टाकण्याच्या मोबदल्यात तब्बल 1 लाख 68 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नागपुरातील एका RTO एजंटला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले.
ACBच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्याकडे स्वतःच्या तसेच मित्रांच्या मिळून अनेक गाड्या आहेत. या वाहनांवर RTOकडून कारवाई होऊ नये, तसेच वाहनांचे क्रमांक RTOच्या कथित यादीमध्ये देण्यासाठी दरमहा प्रत्येक वाहनामागे ठरावीक रक्कम देण्याची मागणी करण्यात आली होती. यापोटी एकूण 1 लाख 68 हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार हिंगोली ACBकडे करण्यात आली.
तक्रारीच्या पडताळणीदरम्यान 11 ऑगस्ट रोजी ग्रामीण RTO कार्यालय, नागपूरसमोरील आरोपीच्या कार्यालयात पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी यापूर्वी 53 हजार रुपये घेतल्याचे मान्य करत उर्वरित रकमेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याचे ACBच्या अहवालात नमूद आहे.
यानंतर 13 ऑगस्ट रोजी हिंगोली ACBच्या पथकाने सापळा रचला. ग्रामीण RTO कार्यालयासमोर, कपिलनगर रोड परिसरातील आरोपीच्या कार्यालयात तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर आरोपीला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणातील आरोपीचे नाव संजय पुरुषोत्तम कातुरे (वय 43), व्यवसाय RTO एजंट, रा. रतन हाइट्स अपार्टमेंट, मेडिकल स्क्वेअर, नागपूर असे अहवालात नमूद आहे. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 अन्वये जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजाराम फुपाटे, भगवान मंडलिक, गजानन पवार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव तसेच चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अकबर शेख यांचा समावेश होता. कारवाईस पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांचे मार्गदर्शन लाभले.
नावासह रकमेच्या आकड्यात तफावत
दरम्यान, प्रसिद्धीला दिलेल्या अहवालाच्या एका भागात आरोपीचे नाव ‘सचिन कातुरे’ असे नमूद झाले आहे, तर आरोपीच्या तपशीलात ‘संजय पुरुषोत्तम कातुरे’ असे नाव आहे. तसेच लाचेच्या उर्वरित रकमेबाबत अहवालात 1.15 लाख व 1.23 लाख अशा दोन वेगवेगळ्या रकमा नमूद केल्याने संभ्रम निर्माण झाला होता, हे विशेष.
Author: संतोष तायडे
संपादक










