– शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडघे पाटील यांच्या उपस्थितीत विविध सार्वजनिक समस्यांवर मांडली भूमिका
The Exposer
नागपूर : नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडघे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत जनसामान्यांना सार्वजनिक जीवनात भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव प्रफुल्ल भाजे यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर ठोसपणे भूमिका मांडली.
सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या विविध समस्या, प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे अधिक प्रभावीपणे लक्ष देण्याची गरज याकडे भाजे यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसने अधिक आक्रमकपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी SIR (Special Intensive Revision) संदर्भातील मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. SIR प्रक्रियेमुळे नागरिकांवर होणारा संभाव्य परिणाम, मतदारांशी संबंधित प्रश्न आणि या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची आवश्यकता याबाबतही चर्चा करण्यात आली.
जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. आगामी काळात नागरिकांच्या मूलभूत समस्या तसेच लोकशाही आणि मतदारांच्या हक्कांशी संबंधित विषयांवर काँग्रेस अधिक प्रभावीपणे आवाज उठवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीत शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, विविध विभागांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक










