– ज्येष्ठ व निष्ठावान काँग्रेस नेते, व्यापक जनसंपर्काचा पक्ष वाढीसाठी फायदा
The Exposer
नागपूर : नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ व निष्ठावान नेते भाऊराव कोकणे यांची निवड झाल्याबद्दल नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कोकणे यांच्या नियुक्तीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाऊराव कोकणे हे काँग्रेस पक्षाशी दीर्घकाळापासून निष्ठेने जोडलेले असून, पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. शहरातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून, मोठा मित्रपरिवार ही त्यांची संघटनात्मक ताकद मानली जात आहे.
अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविल्याने शहरातील अनुसूचित जाती समाजामध्ये काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आगामी काळात पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी कोकणे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सत्कारप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुडघे पाटील, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, प्रदेश सचिव विजय सराटकर, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव प्रफुल्ल भाजे, राष्ट्रीय शाहू तैलिक समाजाचे अध्यक्ष उमेश शाहू, शहर महासचिव सुनील पाटील, शहर उपाध्यक्ष मामा राऊत, ज्येष्ठ काँग्रेसी नेते महेश श्रीवास्तव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील संघटनात्मक विस्ताराला बळ
भाऊराव कोकणे यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा आणि व्यापक जनसंपर्काचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. त्यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसच्या शहरातील संघटनात्मक विस्ताराला बळ मिळून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.
Author: संतोष तायडे
संपादक










