– ‘स्वाधार’ योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वसतिगृह प्रवेशाचा अर्ज अनिवार्य
The Exposer
नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नागपूर विभागातील शासकीय वसतिगृहांची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यात २५, वर्धा १०, भंडारा ९, गोंदिया ८, चंद्रपूर ११ आणि गडचिरोली ७, अशी एकूण ७० शासकीय वसतिगृहे आहेत. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी निर्धारित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर प्रसाद कुळकर्णी यांनी केले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे.
स्वाधार’ योजनेसाठीही वसतिगृह अर्ज आवश्यक
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने देण्यात येतो. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केलेला असणे अनिवार्य आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, परंतु ते वसतिगृह प्रवेशासाठी पात्र आहेत, अशा विद्यार्थ्यांना नियमानुसार स्वाधार योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे स्वाधार योजनेचा लाभ घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनीही वसतिगृह प्रवेशासाठीचा ऑनलाइन अर्ज वेळेत करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना तातडीने अर्ज करण्याचे आवाहन
वसतिगृह प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे व पात्रतेच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे किंवा स्वाधार योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक










