– Against CAPच्या निर्णयाविरोधात बसपा आक्रमक; OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती पूर्ववत करण्याची मागणी
– The Exposer
नागपूर : OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना Against CAP (ACAP) प्रवेशाच्या कारणावरून शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीपासून वंचित ठेवण्याच्या निर्णयाविरोधात बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या बसपा पदाधिकाऱ्यांना त्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी त्यांना 5 मिनिटाचा वेळ देता आला असता, मात्र मिटिंगला जातं असल्याचे सांगून ते कक्षातून निघून घेले. असा आरोप करीत संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण करून प्रतीकात्मक श्रद्धांजली आंदोलन केले.

या श्रद्धांजलीपर खुर्चीला हार अर्पण करण्याच्या आंदोलनाचा व्हिडीओ बसपा कार्यकर्त्यांनी फेसबुक सह विविध समाज माध्यमावर व्हायरल करुन संताप व्यक्त केला. बसपाचे नागपूर शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी महाज्योती कार्यालयात गेले होते. OBC, VJNT आणि SBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच Against CAP प्रवेशाच्या तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभांपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दोन तास वेळ लागेल, विद्यार्थी वाट पाहतील का?
बसपाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांच्या समस्या व्यवस्थापकीय संचालकांसमोर मांडण्यासाठी त्यांची भेट घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, “दोन तास वेळ लागेल, विद्यार्थी दोन तास वाट पाहतील का? मीटिंगला जात आहे,” असे उत्तर मिळाल्याचा आरोप बसपने केला.
विद्यार्थ्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी आलेल्या प्रतिनिधींना वेळ न देणे ही बाब खेदजनक असल्याचे सांगत बसपा पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संचालकांच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण करून प्रतीकात्मक श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले.
हा वैयक्तिक द्वेष नाही, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा निषेध
रिकाम्या खुर्चीला हार अर्पण करण्याची कृती कोणत्याही व्यक्तीविरोधातील वैयक्तिक द्वेष नसून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, हा संदेश देण्यासाठी करण्यात आल्याचे बसपने स्पष्ट केले. “अधिकारी विद्यार्थ्यांसाठी आहेत, केवळ बैठका घेण्यासाठी नाहीत. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यावर तातडीने निर्णय घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” अशी भूमिका बसपने मांडली.
Against CAPचा निर्णय रद्द करण्याची मागणी
बसपाने महाज्योती प्रशासनाकडे ACAP प्रवेश घेतलेल्या OBC, VJNT आणि SBC विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती नाकारण्याची कार्यवाही रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 आणि 2026-27 मधील विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक फटका बसू नये, यासाठी स्पष्ट आदेश काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभावित विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्या प्रकरणांची तातडीने तपासणी करावी, पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करावी आणि विद्यार्थ्यांकडून अन्यायकारक अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
अन्याय सहन करणार नाही
“OBC, VJNT आणि SBC विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हा त्यांच्या संपूर्ण भवितव्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक लाभ मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू नये. विद्यार्थ्यांवरील अन्याय कदापि सहन केला जाणार नाही,” असा इशारा बसपा शहर अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी दिला.या आंदोलनात शहर उपाध्यक्ष जितेंद्र हिवरकर, शहर सचिव अमित बनसोड, शहर सचिव अजयकुमार, दक्षिण-पश्चिम नागपूर अध्यक्ष सौरभ जामगडे, दक्षिण-पश्चिम नागपूर महासचिव रौनक जांभुळकर यांच्यासह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बसपाने दिल्याने Against CAPचा प्रश्न आता चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक










