– पोलिस भवनात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व पदकांचे वितरण
The Exposer
नागपूर : नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सिव्हिल लाइन्स येथील पोलिस भवनात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर नागपूर शहर व नागपूर ग्रामीण पोलिस दलातील राष्ट्रपती पोलिस पदक, केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिउत्कृष्ट व उत्कृष्ट सेवापदक तसेच पोलिस महासंचालक विशेष सेवापदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि पदक देऊन गौरव करण्यात आला.
राष्ट्रपती पोलिस पदकासाठी निवड झालेले सहायक पोलिस आयुक्त वैभवकुमार जाधव आणि पोलिस हवालदार राजकुमार जनबंधू यांचा विशेष सन्मान करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिउत्कृष्ट सेवापदक प्राप्त सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे, सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव, नरेंद्र हिवरे, पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांच्यासह एकूण १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
तसेच गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक प्राप्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक रितेश आहेर, मुकुंद कवाडे, ज्ञानेश्वर भेदोडकर, प्रमोद घोंगे आणि चंद्रकांत काळे यांच्यासह २१ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
पोलिस महासंचालक विशेष सेवापदक प्राप्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर आणि सहायक पोलिस निरीक्षक निलेश उरकुडे यांचाही गौरव करण्यात आला. तसेच खडतर सेवापदक प्राप्त पोलिस उपनिरीक्षक सुनील जाधव, नितीन अवधूत आणि अनिल तुमसरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, विनिता शाहू, नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस अधिकारी-कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक















