२४ तासांत चोरीचा पर्दाफाश; २७.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

-गुन्हे शाखा युनिट-६ची धडाकेबाज कारवाई; कोराडीतील घरफोडीप्रकरणी २३ वर्षीय आरोपी ताब्यात

The Exposer
नागपूर : कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६च्या पथकाने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत २३ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून तब्बल २३ तोळे सोने आणि मोबाईल असा एकूण २७ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संदीप वामनराव वानखेडे (वय ४९) यांच्या कोराडी येथील KTPS कॉलनीतील घरात दि. १६ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजल्यापासून दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरी झाली होती. याप्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६६/२०२६, कलम ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध

गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक ६च्या पथकाला खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित शांतनू चंदू वानखडे (वय २३, रा. माधान, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.

चौकशी व तपासादरम्यान त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सोन्याचा मोठा साठा जप्त

पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे दोन मोठे सिक्के, मंगळसूत्र, चैन, बांगड्या, कानातील रिंग, अंगठी तसेच इतर सोन्याचे सिक्के असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. यासोबतच Vivo V7 मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २७ लाख ७८ हजार रुपये असून, त्यामध्ये सुमारे २३ तोळे सोने असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी कोराडी पोलीस ठाण्याच्या रात्रपाळी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखेच्या वेगवान तपासाचे कौतुक

चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने गुन्हे शाखा युनिट-६च्या तपासाची चर्चा होत आहे. गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे हा गुन्हा उघडकीस आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक ६च्या पथकाने केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More