– हुक्का पार्लरवर छापा; ३ जण ताब्यात, ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : रात्रगस्तीदरम्यान सामाजिक सुरक्षा पथकाने पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर धडक कारवाई करत तीन जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत हुक्का पॉट, विविध हुक्का फ्लेवर्स तसेच हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ३१ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सिद्धार्थ नगर, टेका नाका येथील प्लॉट क्रमांक २, श्री मंगल डेअरीसमोर ही कारवाई करण्यात आली. २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.५४ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान शाहरुख नसरुल्ला खान (३०), शेख अरमान शेख नासिर (२०) आणि मोहम्मद समीर मोहम्मद अन्सारी (२०) हे ग्राहकांना तंबाखूजन्य पदार्थ हुक्क्याच्या माध्यमातून पुरविताना तसेच त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळावरून हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर्स आणि हुक्का सेवनासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी तंबाकू उत्पादने अधिनियम २००३ मधील कलम ४, ७, ८, २०, २१ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २७२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर सामाजिक सुरक्षा पथकाने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध हुक्का व्यवसायाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Author: संतोष तायडे
संपादक















