– मानेवाडा रोड पोस्ट ऑफिस मृत्यूच्या छायेत! जीर्ण इमारतीत नागरिक-कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात; तातडीने स्थलांतराची मागणी
The Exposer
नागपूर : नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असतानाही प्रशासनाची उदासीनता कायम राहणार का? केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय डाक विभागाच्या मानवाडा रोड पोस्ट ऑफिसची जीर्ण व धोकादायक इमारत नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इमारतीची दुरवस्था समोर आल्यानंतरही मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
मानवाडा रोडवरील या पोस्ट ऑफिसमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक, ग्राहक आणि कर्मचारी ये-जा करतात. मात्र, इमारतीच्या मागील भागातील भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून काही भाग जीर्ण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भिंत जीर्ण, लोखंडी संरचना गंजलेली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गवत—अशा धोकादायक परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरवशावर? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
‘दुर्घटना होईपर्यंत प्रशासन झोपणार का?’

या गंभीर परिस्थितीची दखल घेत अखिल भारतीय ग्राहक पंचायत, विदर्भ प्रांताचे सह सचिव विलास ठोसर यांनी तक्रार निवेदनाद्वारे वरिष्ठ अधीक्षक डाक, नागपूर शहर विभाग तसेच पोस्टमास्टर जनरल, नागपूर रिजन यांच्याकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, इमारतीची सक्षम तांत्रिक अधिकारी अथवा Structural Engineer यांच्यामार्फत तातडीने तपासणी करण्यात यावी. इमारत धोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्यास नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात न घालता पोस्ट ऑफिस सुरक्षित ठिकाणी तातडीने स्थलांतरित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
डिजिटल इंडिया’च्या घोषणांमध्ये पोस्ट ऑफिस मात्र जीर्ण अवस्थेत!
एकीकडे केंद्र सरकार डिजिटल इंडिया, आधुनिक सेवा आणि नागरिककेंद्री प्रशासनाच्या घोषणा करत आहे; मात्र दुसरीकडे केंद्राच्या अखत्यारितील पोस्ट ऑफिसची इमारतच धोकादायक अवस्थेत असल्याचा आरोप समोर आला आहे. घोषणांचा गाजावाजा मोठा; पण नागरिकांच्या डोक्यावरची जीर्ण छप्परं आणि भेगाळलेल्या भिंती कधी दुरुस्त होणार? असा थेट सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
नागरिकांकडून शुल्क आकारून सेवा देणाऱ्या सरकारी यंत्रणेने त्याच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारीही स्वीकारणे अपेक्षित आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर चौकशी, पंचनामा आणि जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आजच ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे.
जीव गेल्यानंतर जागे होण्याची वेळ येऊ देऊ नका!
धोकादायक भागात नागरिकांचा प्रवेश नियंत्रित करावा, तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे, आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करावी आणि इमारत असुरक्षित असल्यास पोस्ट ऑफिसचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रश्न केवळ एका पोस्ट ऑफिसच्या इमारतीचा नाही; प्रश्न दररोज तेथे येणाऱ्या असंख्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीविताचा आहे. आता प्रशासनाने ‘दुर्घटना घडल्यावर कारवाई’चा सरकारी पायंडा कायम ठेवायचा की ‘दुर्घटना होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय’ करून नागरिकांचे प्राण वाचवायचे, हे स्पष्ट करण्याची वेळ आली आहे.मानेवाडा रोड पोस्ट ऑफिसच्या धोकादायक इमारतीबाबत प्रशासन तातडीने काय निर्णय घेते, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















