एमडीच्या जाळ्यात तरुणाईला ओढण्याचा धक्कादायक डाव!

– नागपुरात एमडी पावडर विक्रीचा पर्दाफाश; चार संशयित ताब्यात
– शाळा-महाविद्यालयीन तरुणांपर्यंत ड्रग्ज पोहोचवण्याचा धोका गंभीर

The Exposer
नागपूर : नागपूर शहरात अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असतानाच कपिलनगर पोलिसांनी एमडी पावडर विक्रीच्या संशयावरून चार जणांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे शहरातील तरुणाईपर्यंत एमडीसारखे घातक अमली पदार्थ पोहोचविणाऱ्या साखळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे ६.४० वाजता कपिलनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला.

ऑटोमोटिव्ह चौकाकडून कामगारनगर चौकाकडे जाणाऱ्या रोडवर एका काळ्या रंगाच्या ऍक्टिव्हा व स्कूटरजवळ काही संशयित आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांची नावे प्राची रतन सहारे (२६), श्रद्धा लेनिन फुडूले (२८), नंदू विष्णू हालगोणे (२६) आणि चेतन महादेव ढवळे (३०) अशी असल्याचे समोर आले.

संशय बळावल्यानंतर पोलिसांनी झडती घेतली असता एका झिपलॉक पिशवीत सुमारे ३.४० ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. याशिवाय चार मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दोन दुचाकी असा एकूण २ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तरुणाईला लक्ष्य करण्याचा संशय; तपासाची दिशा महत्त्वाची

एमडीसारख्या घातक अमली पदार्थांची विक्री केवळ काही व्यक्तींपुरती मर्यादित नसून त्यामागे ग्राहकांपर्यंत पोहोचविणारी मोठी साखळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांना या जाळ्यात ओढले जात आहे का, याचा तपास पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

एमडी विक्रीसाठी तरुणी किंवा तरुणांचा वापर केला जातो का, त्यांना कोणाकडून अमली पदार्थ पुरवले जातात आणि शहरातील कोणत्या भागांत त्याची विक्री केली जाते, याचा तपास होणे गरजेचे आहे. या कारवाईतून मोठ्या ड्रग्ज नेटवर्कपर्यंत पोलिस पोहोचतात का, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध NDPS Act मधील कलम ८(क), २२(ब) आणि २९ अन्वये कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता शाह, पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप पखाले, सहायक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वपोनि. सतीश आडे, पोउपनि. रणजीत रननवरे, पोहवा शहजाद शेख व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.

मुख्य पुरवठादार आणि वितरण साखळीचा व्हावा पर्दाफाश

नागपुरातील तरुणाईला एमडीच्या विळख्यातून वाचवण्यासाठी केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या अमली पदार्थामागील मुख्य पुरवठादार आणि संपूर्ण वितरण साखळीचा पर्दाफाश करणे आता पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More