– धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन करावे; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
The Exposer
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे दीक्षाभूमी हे देशभरातील बौद्ध समाजाच्या श्रद्धेचे, प्रेरणेचे आणि ऐतिहासिक अस्मितेचे केंद्र बनले आहे. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो बौद्ध अनुयायी नागपूरमध्ये दाखल होतात.
मात्र, लाखोंचा जनसागर उसळणार असताना उपलब्ध मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत असल्याने प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, यासाठी यंदा आधीच ठोस आणि व्यापक नियोजन करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नागपूर शहराच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, नागपूर यांना निवेदन देऊन दीक्षाभूमी आणि परिसरातील सुविधा मोठ्या प्रमाणात वाढविण्याची मागणी केली. नागपूर महानगरपालिका दरवर्षी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर सुविधा उपलब्ध करून देते. प्रशासनाच्या या प्रयत्नांचे स्वागत करतानाच, लाखो अनुयायांच्या तुलनेत या सुविधा अपुऱ्या ठरत असल्याने त्यांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
निवारा ते आरोग्यसेवा; सुविधांचा विस्तार करा
देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशा प्रमाणात निवारा, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पिण्याचे पाणी, वैद्यकीय केंद्रे, स्वच्छता व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहतूक व पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अनुयायांसाठी विशेष सुविधा, महिला व मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र उपाययोजना आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या काही दिवस आधी नव्हे, तर त्यापूर्वीच सर्व सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेल्या असाव्यात, यासाठी समाज कल्याण विभाग, नागपूर महानगरपालिका आणि संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी मागणी पक्षाने केली.
मागील अनुभवातून धडा घेऊन यंदा सक्षम नियोजन करा
दरवर्षी लाखो अनुयायी नागपूरमध्ये येत असताना गर्दी, वाहतूक, पार्किंग, पाणी, स्वच्छता आणि निवाऱ्याशी संबंधित प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे मागील वर्षांच्या अनुभवाचा आढावा घेऊन यंदा अधिक व्यापक, शिस्तबद्ध आणि सक्षम नियोजन करावे, अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नागपूर शहराने मांडली.
देशाच्या विविध भागांतून श्रद्धेने नागपूरमध्ये येणाऱ्या बौद्ध अनुयायांचे सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरणात स्वागत होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, त्यामुळे याबाबत कोणतीही कुचराई होऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे, नागपूर शहर कार्याध्यक्ष क्षितिज गायकवाड, नागपूर शहर महासचिव रजत महेशगवळी, उपाध्यक्ष सुरेश खोब्रागडे, मनोज वासनिक, सौरभ वाघमारे, ज्ञानदीप गायकवाड, अश्वजीत गायकवाड, अमन खरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक















