– अजनी हद्दीतील नरेंद्रनगरच्या सुंदरबन परिसरात चाकूने वार करून हत्या
– त्रिकोणी प्रेमसंबंधातून गुंडांची रक्तरंजित झटापट; दोघे संशयित आरोपी ताब्यात
The Exposer
नागपूर : नागपूरच्या गुन्हेगारी विश्वात पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्षाचा थरार पाहायला मिळाला. क्रिकेट बुकी सुभाष शाहू हत्याकांडातील आरोपी ‘गमछू लांबट’च्या हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात हिस्ट्रीशीटर गौरव पंकज रगडे (२७, रा. कुंजीलालपेठ, अजनी) याचीच चाकूने वार करून हत्या करण्यात आली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रनगर परिसरातील सुंदरबन भागात गुरुवारी ही थरारक घटना घडली.
या प्रकरणात गौरव रामभाऊ राऊत (२७) आणि अभिषेक वासनिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.
गुन्हेगारी विश्वातील एकाची हत्या, दुसऱ्याचा रक्तरंजित अंत!
गौरव रगडे हा कुख्यात गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर होता. काही वर्षांपूर्वी शहरात गाजलेल्या क्रिकेट बुकी सुभाष शाहू हत्याकांडातील आरोपी ‘गमछू लांबट’च्या हत्या प्रकरणातही त्याच्यावर आरोप होता. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, घरफोडी, दरोडा, लूटमार व प्राणघातक हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
अजनी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध हत्या व हत्येच्या प्रयत्नासह सुमारे नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, रगडे हा अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता, अशी माहिती समोर आली आहे.
त्रिकोणी प्रेमसंबंधाने पेटवला गुन्हेगारी संघर्ष?
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मूळची मुंबई येथील ‘स्वपना’ (बदललेले नाव) हिच्यासोबत रगडेचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याचवेळी रगडेचा मित्र असलेल्या गौरव राऊतचेही स्वप्नासोबत जवळचे संबंध निर्माण झाल्याचा संशय रगडेला होता. राऊतने नरेंद्रनगर परिसरात स्वप्नासोबत हॉटेल/क्लाऊड किचन सुरू केले होते. हॉटेलजवळच तो भाड्याच्या घरात राहत होता.
पार्टीची माहिती मिळताच रगडे संतापला!
गुरुवारी दुपारी स्वपना राऊतच्या घरी गेली होती. तेथे राऊतचे काही मित्रही उपस्थित होते. सर्वांनी पार्टी केल्याची माहिती रगडेला मिळाल्यानंतर तो संतापला आणि थेट राऊतच्या घरी पोहोचला. घराचा दरवाजा बंद असल्याने रगडेने दरवाजावर दगडफेक करत शिवीगाळ सुरू केली. परिस्थिती चिघळल्याचे लक्षात येताच राऊत आणि त्याच्या मित्रांनी घराच्या मागील दरवाजातून पळ काढला.
सुंदरबन नाल्याजवळ थरार; चाकू हिसकावून रगडेवरच वार!
रगडेने राऊतचा पाठलाग सुरूच ठेवला. नरेंद्रनगरातील सुंदरबन नाल्याजवळ दोघे आमनेसामने आल्यानंतर त्यांच्यात जोरदार झटापट झाली. याचवेळी अभिषेक वासनिक तेथे पोहोचला. झटापटीदरम्यान रगडेच्या हातातील चाकू हिसकावण्यात आला आणि राऊत व वासनिक यांनी त्याच्यावर चाकूने अनेक वार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. गंभीर जखमी झालेला रगडे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार होण्याच्या तयारीत होते.
वर्दळीच्या परिसरात रक्तपात; नागरिकांमध्ये खळबळ
वर्दळीच्या ठिकाणी अचानक झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गंभीर जखमी रगडेला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
पोलिसांची धावपळ; पळून जाण्याआधीच दोघे ताब्यात
घटनेची माहिती मिळताच अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन राजकुमार तसेच बेलतरोडीचे पोलीस अधिकारी प्रभाकर कावळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, राऊत आणि वासनिक हे घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास अजनी पोलीस करीत असून, हत्या नेमकी कोणत्या कारणातून आणि पूर्वनियोजित कट होता की अचानक झालेल्या झटापटीत रगडेची हत्या झाली, याचा तपास सुरू आहे.
गुन्हेगारी विश्वातील जुन्या वैराचा धागा?
रगडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी, ‘गमछू लांबट’ हत्याकांडातील त्याची कथित भूमिका, नुकताच मिळालेला जामीन आणि आता झालेली हत्या यामुळे या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. त्रिकोणी प्रेमसंबंध हा हत्येचा तात्कालिक कारण ठरला असला, तरी या रक्तरंजित हत्येमागे गुन्हेगारी वैराचा आणखी कोणता धागा आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. नरेंद्रनगरातील या थरारक हत्याकांडामुळे नागपूरच्या गुन्हेगारी विश्वातील हिंसक संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















