शताब्दी चौकात साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य म्युरल आर्ट पुतळा!

– आमदार अभिजित वंजारींचा शब्द ठरला खरा; आमदार निधीतून स्मारक उभारणीसाठी हालचालींना वेग — मनपा प्रशासनाने घेतली दखल

The Exposer
नागपूर : दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील छत्रपती चौक ते मानेवाडा चौक मार्गावरील ‘परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक’ आता लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आणि आकर्षक म्युरल आर्ट स्वरूपातील पुतळ्याने सुशोभित होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आमदार अभिजित गो. वंजारी यांनी या स्मारकासाठी पुढाकार घेतल्यानंतर आता नागपूर महानगरपालिका प्रशासनानेही या मागणीची दखल घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार अभिजित वंजारी यांची भेट घेऊन नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह सविस्तर निवेदन सादर केले होते. शताब्दी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायमस्वरूपी भव्य पुतळा उभारावा तसेच चौकाचे सर्वांगीण सुशोभीकरण करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती.

आमदार वंजारींच्या पुढाकाराला मनपाची प्रशासकीय दखल

या मागणीची दखल घेत आमदार अभिजित वंजारी यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे शताब्दी चौकात म्युरल आर्ट स्वरूपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारून चौकाचे सौंदर्यीकरण करण्याची विनंती केली. या कामासाठी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

आमदारांच्या पत्रासह संबंधित प्रस्तावावर मनपा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली असून, मनपा मुख्यालयाकडून हे प्रकरण धनतोली झोनकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. संबंधित कार्यालयाने विहित प्रपत्रात आवश्यक ठराव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, जेणेकरून त्यानंतरची कार्यवाही करता येईल.

मनपा प्रशासनाने या पत्रव्यवहाराची प्रत ‘परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक स्मारक समिती’ तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांना माहितीसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता प्रशासकीय स्तरावर अधिकृत गती मिळाली आहे.

तात्पुरत्या छायाचित्राऐवजी आता कायमस्वरूपी स्मारकाची मागणी

महापालिकेने या चौकाला ‘परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक’ असे अधिकृत नाव दिले असले तरी सध्या येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी अँगलवर लावण्यात आले आहे.

इतिहास, सामाजिक चळवळ आणि संविधानवादी विचारांचा वारसा असलेल्या या चौकाला बाबासाहेबांच्या कार्याला साजेसे कायमस्वरूपी स्मारक असावे, अशी नागरिक आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांची मागणी आहे. प्रस्तावित म्युरल आर्ट पुतळ्यासोबत चौकात आकर्षक प्रकाशयोजना, हरितीकरण आणि आवश्यक नागरी सुविधांसह सर्वांगीण सुशोभीकरण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू

हा चौक फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणी तसेच संविधानवादी चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. संविधान दिन, जयंती, सामाजिक उपक्रम, जनजागृती कार्यक्रम आणि विविध जनआंदोलनांसाठी या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. त्यामुळे या चौकाला केवळ नावापुरते नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना साजेसे भव्य स्मारक आणि विकसित चौकाचे स्वरूप मिळावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.

वडिलांच्या कर्मभूमीत मुलाकडून बाबासाहेबांना अभिवादन

विशेष म्हणजे, आमदार अभिजित वंजारी यांचे वडील मा. गोविंदराव वंजारी हे एकेकाळी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यामुळे वंजारी कुटुंबाशी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या जोडलेल्या या परिसरात आमदार अभिजित वंजारी यांच्या आमदार निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य म्युरल आर्ट पुतळा उभारण्याचा प्रस्ताव विशेष महत्त्वाचा ठरत आहे.

आंबेडकरी कार्यकर्त्यांना दिलेला शब्द आमदार अभिजित वंजारी यांनी कृतीतून पाळला असून, त्यांच्या पुढाकारामुळे या स्मारकाच्या उभारणीच्या प्रक्रियेला आता प्रशासकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. मनपा प्रशासनाकडून पुढील आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शताब्दी चौकाला बाबासाहेबांच्या भव्य म्युरल आर्ट स्मारकाचे नवे रूप मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात, पत्रकार संतोष तायडे, सोनू मंडपे, दिलीप बेलीयां यांच्यासह अनेक नागरिक आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

पत्रातील उल्लेखाने स्पष्ट झाले चित्र

मनपा प्रशासनाच्या पत्रात ‘परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक स्मारक समिती’ने चौकात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचा म्युरल आर्ट स्वरूपातील भव्य पुतळा उभारून चौकाचे सौंदर्यीकरण करण्याबाबत केलेल्या विनंतीचा स्पष्ट उल्लेख आहे. संबंधित परिसर धनतोली झोनच्या अखत्यारित येत असल्याने पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक प्रस्ताव/ठराव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘शताब्दी चौकात बाबासाहेबांचा भव्य म्युरल आर्ट पुतळा’ ही केवळ मागणी राहिलेली नसून, आता ती मनपा प्रशासनाच्या कार्यवाहीच्या टप्प्यावर पोहोचली आहे, हे या पत्रव्यवहारातून स्पष्ट झाले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More