– बुरखाधारी महिलेवर संशय; यशोधरानगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बालिकेला घेतले ताब्यात — संशयित महिलेचा शोध सुरू
The Exposer
नागपूर : डागा रुग्णालयातून अवघ्या एक दिवसाच्या नवजात बालिकेला एका महिलेने घेऊन गेल्याच्या धक्कादायक घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांसह संपूर्ण शहरातील पोलिस यंत्रणा बालिकेच्या शोधासाठी ॲक्शन मोडवर आली. अखेर यशोधरानगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बालिकेचा शोध घेत तिला सुखरूप ताब्यात घेतले. बालिका सुखरूप मिळाल्याने पोलिस दलासह कुटुंबीयांनीही सुटकेचा श्वास सोडला.

विश्वसनीय सूत्रनुसार, गोळीबार चौक परिसरातील प्रभा शक्ती पाथरबे (३०) यांना प्रसूतीसाठी बुधवारी रात्री डागा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची सामान्य प्रसूती झाली आणि त्यांनी मुलीला जन्म दिला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बुरखा परिधान केलेली एक अनोळखी महिला रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरील नवजात बालिकांच्या वॉर्डमध्ये आल्याची माहिती समोर आली. संबंधित महिलेने बालिकेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे सांगितल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर काही वेळातच नवजात बालिका रुग्णालयातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले.
बालिका बेपत्ता होताच पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडवर
एक दिवसाच्या नवजात बालिकेला रुग्णालयातून घेऊन गेल्याची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, प्रवेश-निर्गमन मार्ग तसेच संशयित महिलेच्या हालचालींची माहिती तपासण्यास सुरुवात करण्यात आली. घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतल्याची माहिती असून, बालिकेचा तातडीने शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके सक्रिय करण्यात आली.
यशोधरानगर पोलिसांना मिळाली महत्त्वाची गुप्त माहिती
दरम्यान, यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस चांद शेख यांना या प्रकरणाच्या तपासादरम्यान महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वी ज्या महिलेच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला होता, त्या महिलेने एका बालिकेला आपल्या ताब्यात आणले असून ती बालिका घराजवळील एका परिचिताच्या घरी ठेवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पीआय युनूस चांद शेख यांनी दोन्ही डीबी पथकांसह तातडीने कारवाई केली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेत नवजात बालिकेला सुखरूप ताब्यात घेतले आणि तिला पोलीस ठाण्यात आणले.
तीन दिवसांपूर्वीच संशयित महिलेच्या बाळाचा मृत्यू?
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिलेची सुमारे तीन दिवसांपूर्वी प्रसूती झाली होती. मात्र तिच्या नवजात बाळाचा जन्मानंतरच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर महिलेची मानसिक स्थिती बिघडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर तिने डागा रुग्णालयातून नवजात बालिकेला कथितरित्या घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप पोलिस तपासातून होणे बाकी आहे.
संशयित महिला यशोधरानगर हद्दीतील?
प्राथमिक माहितीनुसार, या घटनेतील संशयित महिला यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिपू सुलतान चौक परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे पथक तिच्या शोधासाठी संभाव्य ठिकाणी रवाना झाले असून तिचा शोध सुरू आहे. दरम्यान, बालिका रुग्णालयातून नेमकी कशी बाहेर नेण्यात आली, या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, संशयित महिलेचा नेमका उद्देश काय होता आणि बालिकेला परिचिताच्या घरी का ठेवण्यात आले, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
काही तासांत बालिका सुखरूप; मोठा अनर्थ टळला!
एक दिवसाच्या नवजात बालिकेच्या बेपत्ता होण्याने संपूर्ण नागपूर शहरात खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच बालिकेला सुखरूप शोधून काढल्याने मोठा अनर्थ टळला. आता संशयित महिलेचा शोध घेऊन या संपूर्ण प्रकरणामागचे नेमके कारण काय, याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तसेच नवजात बालिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयातील सिसिटीव्ही सह सुरक्षा व्यवस्थेवरही या घटनेमुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















