शिक्षण विभागात नोकरीचे आमिष दाखवून ६.५९ लाखांचा गंडा!

– समाजसेवक असल्याचे भासवून ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

The Exposer
नागपूर : शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून कुटुंबातील सदस्यांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल ६ लाख ५९ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. नोकरी न लावता पैसे परत मागितल्यानंतरही वारंवार टाळाटाळ केल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर श्यामसुंदर समुद्रे (वय ६५), रा. शिवमंदिर, रामकृष्ण शिक्षण गैराज, गांजापेठ, फायर ब्रिगेड, नागपूर यांची मॉर्निंग वॉकदरम्यान राहुल श्रीराम बहोरिया (वय ४०), रा. हनुमान पारशी समाज मंदिर, लोढीपुरा, गणेशपेठ, नागपूर याच्याशी ओळख झाली. राहुलने आपण समाजसेवक असल्याचे भासवून समुद्रे यांच्याशी जवळीक वाढवली. तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर राहुलने समुद्रे यांच्या मुलगी, सून तसेच इतर नातेवाईकांना नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने आपले साथीदार शुभम भुरसाटे, अभिजीत कृष्णराव देशमुख, सीमा खंडेवाल आणि गीत अवस्थी यांच्यासोबत संगनमत केले. आरोपी क्रमांक २ ते ४ हे शिक्षण विभागातील अधिकारी असल्याचे भासवून समुद्रे यांचा विश्वास अधिक दृढ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

१५ जुलै २०२६ ते २७ ऑगस्ट २०२६ रोजी या कालावधीत समुद्रे यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली विविध कारणे सांगून त्यांच्याकडून ५ लाख १३ हजार रुपये घेण्यात आले. एवढ्यावरच न थांबता समुद्रे यांचे मित्र गुलाब बैस यांच्या मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही १ लाख ४६ हजार रुपये घेतले.

अशा प्रकारे दोघांकडून मिळून एकूण ६ लाख ५९ हजार रुपये घेण्यात आले. मात्र, कोणालाही नोकरी मिळवून देण्यात आली नाही. पैसे परत मागितल्यानंतरही आरोपींकडून सातत्याने टाळाटाळ करण्यात आली. अखेर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर समुद्रे यांनी पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More