– कॅनरा बँकेच्या फ्रेंड्स कॉलनी शाखेतील धक्कादायक प्रकार; १७० ग्रॅम सोन्याचे कडे, सहा चेन अन् अर्धा किलो चांदीच्या वस्तू बेपत्ता
The Exposer
नागपूर : बँकेच्या लॉकरमध्ये आयुष्यभराची कमाई, दागिने आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याचा विश्वास असलेल्या ग्राहकांना हादरवून सोडणारा प्रकार नागपुरात समोर आला आहे. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या नागपुरातील महिलेने कॅनरा बँकेच्या फ्रेंड्स कॉलनी शाखेतील लॉकर उघडला असता त्यामधील लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू गायब असल्याचे आढळले. या प्रकारामुळे बँकेच्या लॉकरच्या सुरक्षिततेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विनिता प्रभात सिंग (वय ४९) या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असून, त्यांचे माहेर नागपुरातील फ्रेंड्स कॉलनीत आहे. त्यांचे सासर रायपूर (छत्तीसगड) येथे आहे. त्यांचे सासरे जितेंद्र नाथ सिंग यांचे एप्रिल २०२६ मध्ये निधन झाले. त्यानंतर विनिता २१ जुलै २०२६ रोजी भारतात आल्या आणि फ्रेंड्स कॉलनीतील आई-वडिलांकडे राहू लागल्या.
९ ऑगस्ट २०२६ रोजी त्या कॅनरा बँकेच्या फ्रेंड्स कॉलनी शाखेत लॉकर क्रमांक २३९ तपासण्यासाठी गेल्या. लॉकर उघडल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या म्हणण्यानुसार, लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे १७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे, बांगड्यांसह सोन्याच्या सहा चेन, सुमारे अर्धा किलो वजनाची चांदीची भांडी आणि इतर मौल्यवान वस्तू गायब असल्याचे आढळले.
या प्रकारानंतर विनिता यांनी तत्काळ शाखा व्यवस्थापकांकडे तक्रार केली. लॉकरच्या देखभालीशी संबंधित नोंदवहीची पाहणी केली असता काही नोंदींमध्ये कथित तफावत, खोडतोड, व्हाइटनरचा वापर आणि आवश्यक काउंटर-सिग्नेचर नसल्याचे आढळल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.
दरम्यान, विनिता यांनी शाखा व्यवस्थापकांकडे तातडीने कारवाईची मागणी केली. हे प्रकरण बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गुरुवारी पुन्हा बँक शाखेत जाऊन विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विनिता यांना ३१ ऑगस्ट रोजी इंग्लंडला परतायचे असल्याने या प्रकरणाचे वास्तव समोर यावे, यासाठी त्यांनी गुरुवारी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे.
प्रश्न एका लॉकरचा नाही, हजारो ग्राहकांच्या सुरक्षेचा!
बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याचा विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्रकार गंभीर इशारा मानला जात आहे. लॉकरच्या नोंदवहीत कथित तफावत, खोडतोड आणि काउंटर-सिग्नेचरचा अभाव असल्याचा दावा समोर आल्याने लॉकर व्यवस्थापनाची कार्यपद्धती आणि सुरक्षाव्यवस्था तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिस तपासातून दागिने नेमके कसे गायब झाले, याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे गिट्टीखदान पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक















