– महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार; लग्नास नकार देत फोटो व्हायरल करण्याची धमकी, पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा आरोप
The Exposer
नागपूर : राज्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे अंगरक्षक असलेल्या अजय सलामे याच्याविरुद्ध रामटेक पोलिस ठाण्यात २६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित असूनही लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणामुळे पोलिस विभागासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय सलामे हा राज्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा अंगरक्षक आहे. यापूर्वी तो एका माजी खासदाराचाही अंगरक्षक होता. दोन वर्षांपूर्वी अजयची पीडित महिलेशी ओळख झाली. त्यानंतर तो तिच्या सतत संपर्कात राहू लागला. विवाहित असल्याची माहिती असतानाही त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महिलेने अजयकडे लग्नासाठी आग्रह धरला. मात्र, अजय लग्नास टाळाटाळ करू लागला. तीन दिवसांपूर्वी महिलेने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने तिचे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर पिस्तुलाचा धाकही दाखवल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
पीडित महिलेने थेट पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोद्दार यांनी सलामेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर रामटेक पोलिसांनी अजय सलामे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच अजय सलामे पसार झाला असून रामटेक पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात एका महिलेची भूमिका संशयास्पद असल्याची माहितीही पोलिसांकडून समोर आली आहे. त्यामुळे तपासात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे लक्ष लागले आहे.
राज्यमंत्र्यांचा अंगरक्षकच बलात्काराच्या आरोपात अडकल्याने या प्रकरणाने पोलिस आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पसार आरोपीला पोलिस कधी जेरबंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रानेही ठळकपणे वृत्त प्रकाशित केले आहॆ, हे विशेष.

Author: संतोष तायडे
संपादक















