– मालकासह मॅनेजरवर गुन्हा; 94 हजारांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : दिघोरी परिसरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर वाठोडा पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करीत मॅनेजरला ग्राहकांना हुक्का पुरविताना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रकमेसह एकूण 94 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हुक्का शॉपीचा मालक आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 2.30 वाजता उमरेड रोडवरील दिघोरी परिसरात असलेल्या ‘टेक्सॉन्स स्मोकिंग शॉपी’मध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वाठोडा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धडक दिली.
कारवाईदरम्यान कॅफेचा मॅनेजर ओंकार संदीप मडावी (वय 20), रा. आदर्शनगर, नंदनवन हा ग्राहकांना हुक्का पुरविताना आढळून आला. चौकशीदरम्यान त्याने शॉपीचा मालक अविनाश पर्वतलाल पांडे, रा. साईनगर, वाठोडा असल्याचे सांगितले.
परवाना मागताच उडाली तारांबळ!
पोलिस अधिकाऱ्यांनी हुक्का पार्लर चालविण्याबाबतचा वैध परवाना व आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता आरोपींकडून कोणतेही वैध दस्तऐवज सादर करता आले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत पार्लरमधील साहित्य जप्त केले.
रोख 38 हजारांसह 94 हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून 38 हजार 100 रुपये रोख, विविध आकाराचे हुक्का पॉट, पाइप, विविध फ्लेवरची तंबाखू तसेच इतर साहित्य असा एकूण 94 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी शॉपीचा मालक आणि मॅनेजर यांच्याविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (कोटपा) 2003, महाराष्ट्र सुधारणा अधिनियम-2018 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 33 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक भगवान कोळी आणि त्यांच्या पथकाने केली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, उपनिरीक्षक संजय बनसोड, हवालदार गणेश बोंद्रे आणि सुरेंद्र बुदुरकर यांचा सहभाग होता.
Author: संतोष तायडे
संपादक















