– नगराळा येथील निवासी आश्रमशाळेत खळबळ; विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती
The Exposer
चंद्रपूर/नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती परिसरात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे.
जिवतीजवळील नगराळा गावातील समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या निवासी आश्रमशाळेच्या मेसमध्ये तयार करण्यात आलेल्या वरणात जिवंत पाल पडल्याचे आढळून आल्यानंतर अंदाजे ३१ विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
विश्वसनीय सूत्रानुसार, जिवती परिसरातील नगराळा गावात समाजकल्याण विभागांतर्गत श्री. अंब्रू नाईक माध्यमिक आश्रम शाळा तसेच संजय गांधी प्राथमिक आश्रम शाळा कार्यरत आहेत. दोन्ही शाळा निवासी असून त्या एकाच परिसरात लागून आहेत. माध्यमिक आश्रमशाळेत अंदाजे १७० विद्यार्थी, तर प्राथमिक आश्रमशाळेत अंदाजे ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी मेसमधून भोजनाची व्यवस्था करण्यात येते.
जेवण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास
नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी विद्यार्थी जेवणासाठी मेसमध्ये आले. त्यापैकी अंदाजे ३१ विद्यार्थ्यांनी भोजन घेतल्यानंतर गरम वरणात जिवंत पाल पडल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत काही विद्यार्थ्यांचे जेवण पूर्ण झाले होते.
जेवणानंतर काही वेळातच काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले. काहींना मळमळ, तर काही विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने आश्रमशाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या राजुरा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या गंभीर घटनेसंदर्भात चंद्रपूर येथील समाजकल्याण विभागाचे अधिकारी महातुरे तसेच माकोडे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बातमी लिहेपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या घटनेबाबत विभागाची अधिकृत भूमिका मिळू शकली नाही.
गडचिरोलीनंतर चंद्रपूर; आता आश्रमशाळांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा आवश्यक!
गडचिरोलीतील सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेनंतर आता चंद्रपूरातील नगराळा येथील प्रकारामुळे दुर्गम भागातील निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य सुविधा, भोजन व्यवस्थेची गुणवत्ता आणि आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी निवासी आश्रमशाळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सुरक्षित निवास, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण भोजन आणि तातडीची आरोग्यसेवा मिळणे ही शासनाची तितकीच मोठी जबाबदारी आहे.
दुर्गम भागातील शाळांसाठी विशेष सुरक्षा आराखड्याची गरज
नगराळासारख्या दुर्गम भागातील घटनांमुळे आता शासनाने केवळ तात्पुरती चौकशी न करता राज्यातील सर्व निवासी आश्रमशाळांसाठी विशेष सुरक्षा आराखडा तयार करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामध्ये—मेस आणि स्वयंपाकगृहांची नियमित तपासणी, अन्नसुरक्षेसाठी कठोर मानके, सर्प व इतर विषारी प्राण्यांपासून संरक्षण, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, तातडीच्या रुग्णवाहिकेची सुविधा, जवळच्या रुग्णालयाशी आपत्कालीन समन्वय, तसेच दुर्गम भागातील शाळांची स्वतंत्र सुरक्षा तपासणी यासारख्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
शिक्षणासाठी दूरवर; पण आरोग्य आणि सुरक्षेचे काय?
दुर्गम भागात निवासी आश्रमशाळा असणे हे त्या भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आवश्यक असले, तरी अशा ठिकाणी सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. ज्या शाळा अत्यंत दुर्गम भागात आहेत, तेथे आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहोचविण्यास विलंब होऊ नये, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.
गडचिरोली आणि आता चंद्रपूरातील घटनांमुळे शासनाने राज्यातील सर्व आश्रमशाळांचा तातडीने सुरक्षा व आरोग्य ऑडिट करून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देणे ही जबाबदारी आहेच; पण त्यांचे प्राण, आरोग्य आणि सुरक्षितता जपणे ही त्याहून मोठी जबाबदारी आहे. आता या घटनांमधून धडा घेऊन आश्रमशाळा अधिक सुरक्षित करण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होणार का, याकडे पालकांसह संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















