– जीवाची पर्वा न करता पाण्यात घेतली उडी; घाबरलेल्या किशोरीने वाचविणाऱ्यांनाच पकडल्याने सर्वांच्याच जीवावर बेतण्याची वेळ
The Exposer
नागपूर : अंबाझरी आणि फुटाळा तलाव परिसरात जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून एका किशोरीसह तीन महिलांचे प्राण वाचविणाऱ्या शार्क अॅक्वाटिक क्लबच्या जिगरबाज जलतरणपटूंचा सीताबर्डी पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला. अपर पोलीस आयुक्त विनिता साहू यांनी या धाडसी जलतरणपटूंचा गौरव करून त्यांच्या साहसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले.

सीताबर्डी परिसरातील एक 16 वर्षीय किशोरी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. तिच्याकडून लिहिलेली सुसाइड नोट आढळल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिचा शोध सुरू केला होता.
दरम्यान, अंबाझरी तलावात एका किशोरीने उडी घेतल्याची माहिती मिळाली. त्यावेळी तलावाजवळ उपस्थित असलेल्या शार्क ऍक्वाटिक क्लबच्या सदस्यांनी तिला पाण्यात उडी घेताना पाहिले. क्षणाचाही विलंब न करता क्लबचे सदस्य अक्षय नवले, इशांत पांडे, राजनंदिनी समर्थ, लावण्या राऊत, राहुल लांजेवार आणि श्रीमथ मुले यांनी तलावात उडी घेतली.

मूकबधिर जलतरण प्रशिक्षक विजय सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षु जलतरणपटूंनी किशोरीला सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले. मात्र, घाबरलेल्या किशोरीने तिला वाचविण्यासाठी आलेल्या जलतरणपटूंनाच पकडल्याने काही काळ सर्वांच्याच जीवावर बेतण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तरीही या जिगरबाज युवक-युवतींनी प्रसंगावधान राखत किशोरीला सुरक्षित बाहेर आणले.
त्यानंतर तिला उपचारासाठी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती आहे. या धाडसी बचावकार्यातील योगदानाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत, पोलीस अधिकारी यशराज पोमन, तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण गाढवे, रत्नाकर देवकाते आणि विजय सरदार यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या जिगरबाज जलतरणपटूंनी दाखविलेल्या धाडसामुळे एका किशोरीला नवजीवन मिळाले असून, त्यांच्या साहसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















