दोन लाखांचे कर्ज, 6.10 लाखांची वसुली अन् दोन प्लॉटवर डोळा! कथित सावकार ‘बंटी-बबली’वर पुन्हा गुन्हा

– कमलेश हनोतेविरुद्ध आधीच पाच गुन्हे, आरोपीमध्ये अनिता भारद्वाज समावेश
– बेलतरोडीतील पोलिस ठाण्यात एफआयआरने उडाली खळबळ

The Exposer
नागपूर : गरजू नागरिकांना कर्जाच्या जाळ्यात ओढून अवाजवी रक्कम वसूल करण्याचा आणि त्यानंतर त्यांच्या मालमत्तेवर डोळा ठेवण्याचा गंभीर आरोप असलेल्या कथित सावकारी प्रकरणाने नागपुरात पुन्हा खळबळ उडविली आहे. अवघ्या दोन लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात 6 लाख 10 हजार रुपये वसूल केल्याचा, तसेच तक्रारदाराचे दोन प्लॉट कथितरीत्या दबाव व धमकीच्या माध्यमातून हस्तगत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी आरोपी कमलेश गणपतराव हनोते आणि अनिता पुरणलाल भारद्वाज यांच्याविरुद्ध 29 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हा दाखल केला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कमलेश हनोते याच्याविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत यापूर्वीही पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तसेच आरोपी अनिता भारद्वाज हिचा तीन प्रकरणांत कथित सहभाग असल्याचे सांगण्यात येत असून, त्याबाबत अधिकृत पडताळणी तपासातून होणे आवश्यक आहे.

एफआयआरनुसार, निवृत्त शिक्षक दिलीप श्रीराम कुंभारे यांना एप्रिल 2024 मध्ये वैयक्तिक कामासाठी दोन लाख रुपयांची गरज होती. त्यानंतर त्यांच्या खात्यात एक लाख रुपये आणि मुलीच्या खात्यात 99 हजार रुपये फोन-पेद्वारे जमा करण्यात आल्याचे नमूद आहे. त्यावेळी स्वाक्षरी केलेले दोन कोरे धनादेश आणि 100 रुपयांचा कोरा स्टॅम्प पेपर घेण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, विविध खात्यांवर ऑनलाइन रक्कम पाठवून आणि रोख पैसे देऊन एकूण 6 लाख 10 हजार रुपये देण्यात आले. पैसे न दिल्यास मारहाणीची धमकी, शिवीगाळ आणि घर खाली करण्यासाठी दबाव आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे तक्रारदाराच्या मालमत्तेशी संबंधित व्यवहार. वांझरा येथील प्लॉट क्रमांक 24 आणि बेसा येथील प्लॉट क्रमांक 258 संदर्भातील कागदपत्रांवर कथितरीत्या दबावाखाली सह्या करून घेण्यात आल्याचा दावा आहे. जानेवारी 2025 मध्ये कुटुंबीयांना स्कॉर्पिओतून नेऊन नोटरीसमोर करारनाम्यावर सह्या करण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे.

बेलतरोडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 351(2), 352, 3(5) तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलम 39 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक ऋषिकेश दत्तात्रय कडूस करीत असून, फोन-पे व्यवहार, बँक खाती, धनादेश, स्टॅम्प पेपर आणि प्लॉटच्या कागदपत्रांची चौकशी होणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More