– झिंगाबाई टाकळीत रात्रीचा थरार; मारहाणीत यामिनी यादवचा मृत्यू, पतीला अटक
The Exposer
नागपूर : कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट पत्नीच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झिंगाबाई टाकळी परिसरात घडली. संतापाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. गळ्यावर तसेच पोटावर झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला शरीरावर मारहाणीच्या ठळक खुणा दिसून न आल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली; मात्र शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाने या मृत्यूमागचे भयावह वास्तव उघड केले. मणक्याचे हाड तुटल्याचे आणि पोटात रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पतीला बेड्या ठोकल्या.
यामिनी यादव (३८) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती कृष्णलाल शिवराम यादव (४१) याला पोलिसांनी अटक केली आहे. यादव दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील असून, रोजगाराच्या निमित्ताने सुमारे दोन वर्षांपूर्वी नागपुरात आले होते. झिंगाबाई टाकळी परिसरातील एका भाड्याच्या खोलीत ते राहत होते. त्यांना दहा वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी आहे. कृष्णलाल एका बँकेत खासगी काम करीत असल्याची माहिती आहे.
शाब्दिक वादाचे रूपांतर थेट मारहाणीत
बुधवारी रात्री यादव दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर काही वेळातच वाद विकोपाला गेला. संतापलेल्या कृष्णलालने यामिनीला हातबुक्क्यांनी मारहाण केली. तिच्या गळ्यावर तसेच पोटावर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत यामिनी खाली कोसळली. तिची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णलाल तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर यामिनीला मृत घोषित केले.
सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद
महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच मानकापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. प्राथमिक पाहणीत शरीरावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या नव्हत्या. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
मात्र, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या. यामिनीच्या मणक्याचे हाड तुटले असून पोटात रक्तस्राव झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. या गंभीर दुखापती मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
अखेर हत्येचा गुन्हा; पतीला अटक
कृष्णलालला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात ठेवले होते. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत तपासाला गती दिली. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आकस्मिक मृत्यूच्या नोंदीत हत्येचे कलम वाढविण्यात आले. त्यानंतर कृष्णलाल यादव याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
आई गेली, वडील तुरुंगात; दोन चिमुकल्यांवर काळोख
या घटनेने यादव कुटुंबातील दोन चिमुकल्यांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. दहा वर्षांचा मुलगा आणि अवघ्या चार वर्षांची मुलगी एका रात्रीत आईच्या मायेपासून वंचित झाली. आईचा मृत्यू झाला, तर वडील हत्येच्या आरोपात पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे दोन्ही मुले आई-वडिलांच्या आधारापासून दूर झाली असून, त्यांचा पुढील सांभाळ कोण करणार, हा हृदयद्रावक प्रश्न या घटनेनंतर उभा राहिला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















