– गणेशोत्सवाच्या धामधुमीत पोलिसांचा ‘नो डीजे, नो लेझर’ आदेश; ४ सप्टेंबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत कडक निर्बंध
The Exposer
नागपूर : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी आणि प्रकाशप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. डीजेच्या दणदणाटासह बीम-लेझरच्या झगमगाटावरही निर्बंध घालण्यात आले असून, ४ सप्टेंबर ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संबंधित ध्वनियंत्रणा व प्रकाशयंत्रणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
डीजे, ढोल-ताशा अन् प्रेशर सिस्टीमवर पोलिसांची नजर
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार मिरवणुका, डीजे, ढोल-ताशा पथक, प्रेशर म्युझिक सिस्टीम, सुधारित ध्वनियंत्रणा तसेच बीम व लेझर दिव्यांच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे.
बंदीच्या कालावधीत संबंधितांनी ध्वनियंत्रणा आणि प्रकाशयंत्रणा स्वतःच्या ताब्यात सुरक्षितरीत्या सीलबंद करून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित यंत्रणांचा वापर केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सण-उत्सवांच्या मिरवणुकांवर निर्बंधांचा ‘ब्रेक’
जन्माष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजनेबाबांची जयंती, गणेशोत्सवाच्या आगमन-विसर्जन मिरवणुका, धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दुर्गोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनियंत्रणांचा वापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ध्वनीप्रदूषणासोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे आदेशात नमूद आहे.
लेझरच्या झगमगाटालाही ‘लाल दिवा’
उत्सवांमध्ये बीम आणि लेझर दिव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या तीव्र प्रकाशामुळे नागरिकांच्या डोळ्यांवर परिणाम होण्याची तसेच वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणासोबतच प्रकाशप्रदूषणावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मंडळे, आयोजक आणि डीजे चालकांमध्ये अस्वस्थता
या निर्बंधांचा थेट परिणाम गणेश मंडळे, उत्सव आयोजक, ध्वनियंत्रणा चालक आणि प्रकाशयंत्रणा चालकांवर होणार आहे. त्यामुळे सणांचा जल्लोष की पोलिसांचा ‘कडक बंदोबस्त’? असा प्रश्न मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांनी मात्र आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















