हूडकेश्वरमध्ये हॉटेलच्या आड देहव्यवसायाचा पर्दाफाश!

– सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; हॉटेलमालकाला अटक, पीडित तरुणीची सुटका

The Exposer
नागपूर : हडकेश्वर परिसरातील हॉटेलच्या आड सुरू असलेल्या देहव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने भंडाफोड केला. हॉटेलमालकच देहव्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले असून, एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलमालक संतोष बचईराम शर्मा (५१, रा. पार्वतीनगर, अजनी) याला पोलिसांनी अटक केली.

उमरेड मार्गावरील विहीरगाव परिसरातील ‘हॉटेल युनिव्हर्स’मध्ये देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. बुधवारी रात्री बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याने शर्मा याच्याशी व्यवहार केला. व्यवहार निश्चित झाल्यानंतर त्याने पोलिसांना ठरल्याप्रमाणे इशारा दिला.

इशारा मिळताच पोलिसांचा हॉटेलवर धडाका! सामाजिक सुरक्षा शाखेच्या पथकाने तातडीने छापा टाकला. कारवाईदरम्यान एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली. अल्पावधीत अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून तिला देहव्यवसायात ढकलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोख रकमेसह डीव्हीआर, मोबाईल जप्त

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून ३ हजार रुपये रोख, एक मोबाईल, एक डीव्हीआर आणि इतर साहित्य, असा एकूण ५६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संतोष शर्मा याच्याविरुद्ध हडकेश्वर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोनि दर्शन पाटील, सपोनि शिवाजी ननवरे, पोहवा किशोर ठाकरे, आरती चव्हाण, कुणाल बोडखे, नितीन वासने आणि पूनम शेंडे यांच्या पथकाने केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More