नव्याने बांधलेल्या रेल्वे क्वार्टरमध्येच ‘भ्रष्टाचाराची गळती’!

– अवघ्या ३-४ वर्षांत छतांमधून पाणी, भिंतींचा प्लास्टर उखडला; ९६ क्वार्टरांच्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह

The Exposer
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील अजनी रेल्वे कॉलनीत कर्मचाऱ्यांसाठी सन २०२१-२२ मध्ये बांधण्यात आलेल्या ९६ नव्या क्वार्टरांची अवस्था अवघ्या तीन-चार वर्षांतच दयनीय झाल्याने बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नव्या इमारतींच्या छतांमधून पाणी गळत असून भिंतींचा प्लास्टर उखडत आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओलावा व गळतीमुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.‘

नवीन’ क्वार्टर की तीन वर्षांतच जर्जर इमारत?

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या क्वार्टरांची तीन-चार वर्षांतच अशी अवस्था का झाली? बांधकामावेळी वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासली होती का? संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का? कंत्राटदाराला कामाचा दर्जा तपासूनच देयके अदा करण्यात आली का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, अभियांत्रिकी विभागाच्या कथित हलगर्जीपणामुळे आणि कंत्राटदारांशी कथित संगनमतामुळे बांधकामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले. तक्रारी करूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

गळती थांबवण्याऐवजी ‘वरवरची मलमपट्टी’!

क्वार्टरमधील तक्रारी दूर करण्यासाठी अप्रशिक्षित मजुरांकडून काम करून घेतले जात असल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी टाइल्सवरच सिमेंटचा थर देऊन दुरुस्ती केल्याने समस्या कायम राहिली, तर अनेक फ्लॅटमध्ये सीलन व पाण्याची गळती वाढल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, दुरुस्तीच्या नावाखाली वरवरची मलमपट्टी होत असेल, तर मूळ बांधकामातील दोषांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

तक्रारींची दखल नाही; कंत्राटदारांवर मेहरबानी?

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकारी तक्रारस्थळी प्रत्यक्ष पाहणी करण्याऐवजी केवळ कागदोपत्री कार्यवाहीवर भर देत असल्याचा आरोप आहे. तसेच योग्य तांत्रिक तपासणी न करता कंत्राटदारांची देयके मंजूर झाली का? याचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

९६ क्वार्टरांच्या बांधकामाची ‘क्वालिटी टेस्ट’ करा!

अवघ्या काही वर्षांतच नव्या क्वार्टरांची झालेली दुरवस्था पाहता संपूर्ण ९६ क्वार्टरांचे तांत्रिक ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. बांधकामात वापरलेले साहित्य, मंजूर आराखडा, कामाची गुणवत्ता, कंत्राटदाराची जबाबदारी, देखभाल-दुरुस्ती तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

सीआरएमएसचे मंडळ अध्यक्ष वीरेंद्र सिंह यांनीही रेल्वे प्रशासनाकडे नवीन क्वार्टरांची तांत्रिक तपासणी करून बांधकाम साहित्याची गुणवत्ता, बांधकामाचा दर्जा आणि देखभालीतील त्रुटींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आता चौकशी झालीच पाहिजे!

नवीन इमारत तीन-चार वर्षांतच गळू लागते, प्लास्टर उखडते आणि भिंतींना सीलन येते, तर हा केवळ देखभाल-दुरुस्तीचा विषय नसून बांधकामाच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक प्रश्न

९६ नव्या क्वार्टरांची ३-४ वर्षांतच दुरवस्था का?बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासली होती का?कंत्राटदाराला देयके मंजूर करण्यापूर्वी तांत्रिक पाहणी झाली का? गळती व प्लास्टर उखडण्यामागे बांधकामातील दोष आहेत का? तक्रारीनंतरही केवळ वरवरची दुरुस्ती का? या कामासाठी खर्च झालेल्या निधीचे तांत्रिक व आर्थिक ऑडिट होणार का?

टपकणाऱ्या छतांसोबत आता प्रश्नही टपकू लागले आहेत; या ९६ क्वार्टरांच्या बांधकामामागील ‘गुणवत्तेचा खेळ’ नेमका काय, याचा पर्दाफाश करण्यासाठी निष्पक्ष चौकशीची गरज आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More