– हवालदार संदेश शुक्ला, ठाकूर, आडे यांना आयुष्यरक्षक कामगिरीची शाबासकी
– पोलिसांचा सन्मान; ४.७९ लाखांची बॅग परत करणाऱ्या प्रामाणिक ऑटोचालकाचाही गौरव
The Exposer
नागपूर : मृत्यू काही क्षणांवर येऊन ठेपलेला असताना क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेऊन युवकाचे प्राण वाचविणाऱ्या कळमना पोलिसांच्या धाडसी आणि प्रसंगावधान दाखविणाऱ्या कामगिरीची पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दखल घेतली. जीवाची पर्वा न करता युवकाला संकटातून बाहेर काढणारे पोलिस हवालदार संदेश शुक्ला आणि ठाकूर आडे अक्षरशः ‘देवदूत’ ठरले. त्यांच्या आयुष्यरक्षक कामगिरीबद्दल पोलिस आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मृत्यू समोर; पोलिस धावले अन् जीव वाचला!
घटना घडताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संदेश शुक्ला आणि ठाकूर आडे यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. प्रसंगावधान राखत त्यांनी युवकाला धोक्यातून बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे एका युवकाला अक्षरशः नवे जीवन मिळाले. पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिस भवन येथे आयोजित गौरव सोहळ्यात विविध प्रकरणांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-अंमलदारांचाही सन्मान करण्यात आला. कर्तव्य बजावताना दाखविलेली तत्परता, तपासातील कौशल्य, गुन्हेगारांचा छडा लावण्याची क्षमता आणि प्रामाणिकपणाची दखल घेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.
४.७९ लाखांची बॅग सापडली; मोह झुगारून प्रामाणिकपणाचा आदर्श!
लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ऑटोचालकाला रोख रकमेसह सोन्याचे दागिने असलेली तब्बल ४ लाख ७९ हजार रुपयांची बॅग मिळाली. एवढी मोठी रक्कम हातात आल्यानंतरही पैशांचा मोह न ठेवता ऑटोचालक सचिन निखारे यांनी बॅग पोलिसांच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या स्वाधीन केली.
सचिन यांच्या या प्रामाणिकपणाची पोलिस आयुक्तांनी दखल घेत त्यांच्या हस्ते सत्कार केला. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेसोबतच नागरिकांच्या प्रामाणिकपणालाही या सोहळ्यात सलाम करण्यात आला.
घरफोड्यांची मालिका फोडली; सात गुन्ह्यांचा छडा!
हिंगणा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल सात गुन्हे उघडकीस आणले. तपासातील बारकावे हेरत आरोपींपर्यंत पोहोचणाऱ्या पोलिस पथकाच्या कामगिरीचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
खोटी जबरी चोरी रचली; पोलिसांनी ‘खेळ’ उधळला!
हडकेश्वर पोलिसांनी जबरी चोरीची खोटी तक्रार दाखल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासातून उघड केले. बारकाईने केलेल्या तपासामुळे तक्रारीमागील सत्य समोर आले आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न फसला.
यांचा झाला गौरव
वरिष्ठ लिपिक भास्कर राऊत, पोलिस निरीक्षक जितेंद्र बोडे, उपनिरीक्षक संतोष राठोड, पोलिस हवालदार कैलास चव्हाण, अरुण कांबळे, अतुल तलमले, कार्तिक हेडाऊ, अनिल झाडे, प्रवीण बंड, हडकेश्वरच्या ठाणेदार अनामिका मिरझापुरे, सपोनि पप्पीन रामटेके, उपनिरीक्षक सुमेधकुमार जाधव, मुकेश कन्नाके, ऋषभ ठाकरे तसेच कळमना ठाण्याचे पोलिस हवालदार संदेश शुक्ला आणि ठाकूर, आडे यांचा सत्कार करण्यात आला. कर्तव्यनिष्ठा, धाडस, प्रसंगावधान, प्रामाणिकपणा आणि तपासातील कौशल्य दाखविणाऱ्या पोलिस अधिकारी-अंमलदारांच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
Author: संतोष तायडे
संपादक















