– एकाच्या नावावर दुसऱ्याची परीक्षा; बनावट कागदपत्रांच्या आधारे रेल्वे प्रशासनाची फसवणूक
– अंजनी पोलिस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा; पुढील तपास सुरू
The Exposer
नागपूर : रेल्वे विभागाच्या वर्ग ‘ड’ पदभरती प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा आधार घेत दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठाणे अंजनी पोलिस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकारामुळे रेल्वे भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्रकुमार हिरालाल परदेशी (वय ५८, रा. मुंबई) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रेल्वे विभागातर्फे वर्ग ‘ड’ची पदभरती सुरू असून, त्यासाठीची शारीरिक पात्रता परीक्षा ठाणे अंजनी येथील रेल्वे स्टेडियम मैदानावर घेण्यात येत होती.
परीक्षेदरम्यान उमेदवारांची कागदपत्रे तपासताना अंकित रामदास तिवारी (वय २९, रा. बागदा, जि. आगरा, उत्तर प्रदेश) याच्या नावावर शिवम हरीकिशन यादव (वय २६, रा. सलपूर, ता. शिकोहाबाद, उत्तर प्रदेश) हा परीक्षा देण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःची ओळख अंकित रामदास तिवारी अशी भासवून परीक्षा दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याचप्रमाणे राहुलकुमार शिवलाल मीना (वय ३६, रा. बिरगाव, ता. मांडावर, दौसा, राजस्थान) याच्या नावावर बुधाराम श्रीराम मीना (वय २७, रा. बैजूपारा, दौसा, राजस्थान) याने बनावट कागदपत्रांच्या आधारे परीक्षा दिल्याचा प्रकारही समोर आला.
दोन्ही प्रकरणांत उमेदवारांची ओळख बदलून बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाची नियोजनबद्ध पद्धतीने फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. कागदपत्रे पडताळणीदरम्यान हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९ आणि ६१(२) अन्वये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या फर्जीवाड्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, बनावट कागदपत्रे कोणी तयार केली आणि रेल्वे भरतीतील आणखी किती उमेदवार अशा पद्धतीने परीक्षेला बसले, याचा तपास होणे अपेक्षित आहे.
‘मुन्नाभाई’ पॅटर्नने रेल्वे भरतीत घुसखोरीचा प्रयत्न?
दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे आणि भरती प्रक्रियेतील नियमांना बगल देण्याचा प्रयत्न यामुळे या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. या फर्जीवाड्याची व्याप्ती केवळ चार आरोपींपुरती मर्यादित आहे की त्यामागे मोठे रॅकेट सक्रिय आहे, याचा उलगडा आता पोलिस चौघाच्या मोबाईल सिडीआरच्या तपासातून करणार आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















