ई-रिक्षा विकायला आलेल्या अट्टल चोराला अटक; ६ गुन्हे उघडकीस

The Exposer
नागपूर : ई-रिक्षा चोरी करणा-या सराईत चोरट्याला नंदनवन पोलिसांनी अटक केली. चौकशीत पोलिसांनी आरोपीकडून शहरातील वाहनचोरीचे तब्बल ६ गुन्हे उघडकीस आणत ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राहुल उमाकांत ईटनकर (३१, नंदनवन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी केडीके कॉलेज रोडवरून राकेश रामभाऊजी ठाकरे (३५, खरबी) यांची १ लाख ७० हजार रुपयांची ई-रिक्षा (एमएच ४९ बीएम ५५१२) अज्ञात चोरट्याने लांबवली होती. या तक्रारीवरून नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान, संघर्षनगर चौक परिसरात एक इसम चोरीची ई-रिक्षा विक्रीसाठी घेऊन आल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून राहुल ईटनकर याला ताब्यात घेतले. वाहनाची कागदपत्रे नसून त्याने ही ई-रिक्षा केडीके कॉलेज रोडवरून चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने नंदनवन आणि गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून इतर २ ई-रिक्षा, तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एकूण ६ वाहने जप्त करून त्याला अटक केली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More