– ७.८५ ग्रॅम मेफेड्रोनसह १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त; साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार
The Exposer
नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असतानाच सिरसपेठ परिसरात ‘एमडी’ (मेफेड्रोन) विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. इमामवाडा पोलिसांनी एनआयटी गार्डन परिसरात छापा टाकून एमडी पावडर बाळगणाऱ्या गौरव रवी खंते (३२, जुनी मंगळवारी, लकडगंज) याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ७.८५ ग्रॅम एमडीसह तब्बल १ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास इमामवाडा पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत असताना एनआयटी गार्डनजवळ विनानंबरच्या दुचाकीजवळ दोन जण संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांची नजर पडताच दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून गौरव खंते याला ताब्यात घेतले; मात्र त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
खंतेची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशातील सिगारेटच्या पाकिटात ७.८५ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी दुचाकीची झडती घेतली असता डिक्कीत इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि दोन मोबाईल मिळून आले. प्राथमिक तपासात आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एमडीची विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळी आढळलेला मोबाईल पसार झालेल्या केतन सातनुरकर (इमामवाडा) याचा असल्याची माहिती अटक आरोपीने पोलिसांना दिली. याप्रकरणी इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गौरव खंते याला अटक करण्यात आली आहे. फरार साथीदाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
या कारवाईमुळे सिरसपेठ परिसरातील अमली पदार्थांच्या संभाव्य नेटवर्ककडे पोलिसांचे लक्ष वेधले गेले असून, या प्रकरणाच्या पुढील तपासात ड्रग्ज पुरवठ्याची साखळी उघड होते का, याकडे आता लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















