सरकारी रेकॉर्डमध्ये प्लॉटच नाही; मजूर कुटुंबाकडून तब्बल 10.30 लाख हडपल्याचा आरोप!

– सरकारी रेकॉर्डमध्ये प्लॉटच नाही; मजूर कुटुंबाकडून तब्बल 10.30 लाख हडपल्याचा आरोप!
– उमरेडच्या सपना लेआउटमधील धक्कादायक प्रकार; चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल, अटक न झाल्याने पीडितांचा संताप

The Exposer
नागपूर : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मजूर कुटुंबाच्या आयुष्यभराच्या कमाईवरच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उमरेडच्या सपना लेआउटमध्ये समोर आला आहे. सरकारी अभिलेखात अस्तित्वातच नसलेला प्लॉट दाखवून तब्बल 10 लाख 30 हजार रुपये घेतल्याचा आरोप डंभारे कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असतानाही अद्याप आरोपींना अटक झालेली नसल्याने पीडित कुटुंबाने पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तक्रारदार सुमित अनिल डंभारे (27), रा. सपना लेआउट, बालाजीनगर, उमरेड हे रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबासाठी स्वतःचे घर उभारण्याच्या उद्देशाने त्यांनी 2016 मध्ये प्लॉट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 5 जानेवारी 2016 रोजी उमरेड तहसील कार्यालयात त्यांच्या आई अलका डंभारे यांच्या नावावर प्लॉट खरेदीचा व्यवहार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मनोज वसंतराव झोडे (दत्तवाडी, नागपूर), राजेशसिंग उमेशसिंग बैस व दिनेशसिंग उमेशसिंग बैस (दोघेही राणाप्रताप चौक, उमरेड) तसेच भक्तप्रल्हाद गोंदूजी शेंबेकर (श्यामनगर, हुडकेश्वर, नागपूर) यांनी संगनमत करून खसरा क्रमांक 135 मधील प्लॉट क्रमांक 19/ए, क्षेत्रफळ 101.03 चौ.मी. असल्याचे सांगत व्यवहार केला, असा आरोप आहे. या व्यवहारासाठी डंभारे कुटुंबाकडून एकूण 10 लाख 30 हजार रुपये घेण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आईच्या उपचारासाठी घर विकताना ‘प्लॉट’चा पर्दाफाश

दरम्यान, अलका डंभारे यांच्या किडनीवरील उपचारासाठी मोठ्या आर्थिक खर्चाची गरज निर्माण झाली. उपचाराचा खर्च भागविण्यासाठी कुटुंबाने आपले सध्याचे घर विकण्याचा निर्णय घेतला. घर विक्रीची प्रक्रिया सुरू करताना नगररचना विभागाकडून मंजूर नकाशा व अन्य कागदपत्रे मिळवित असताना संबंधित प्लॉटच्या व्यवहारातील कथित अनियमितता समोर आल्याचा दावा डंभारे कुटुंबाने केला आहे.

कागदपत्रांची तपासणी केली असता संबंधित प्लॉटची सरकारी अभिलेखात नोंद नसल्याचे तसेच सातबारा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यानंतर सपना लेआउट व खसरा क्रमांक 135 संदर्भातील अभिलेखांची अधिक तपासणी केली असता प्लॉट क्रमांक 19/ए आणि 101.03 चौ.मी. क्षेत्रफळाचा संबंधित प्लॉट सरकारी रेकॉर्डमध्ये अस्तित्वात नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

10.30 लाख परत मागितले; मात्र टाळाटाळ

प्रकरण समोर आल्यानंतर सुमित डंभारे यांनी चारही आरोपींशी संपर्क साधून दिलेली 10 लाख 30 हजार रुपयांची रक्कम परत मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, रक्कम परत करण्याऐवजी आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

अखेर सुमित डंभारे यांनी 13 जून 2026 रोजी उमरेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गुन्हा दाखल, पण अटक कुठे?

तब्बल 10.30 लाख रुपयांच्या कथित फसवणुकीचा आरोप असलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही अद्याप कोणालाही अटक न झाल्याने पीडित कुटुंबाचा संताप वाढला आहे. गुन्हा दाखल करून तपास सुरू असताना आरोपी मोकाट का? असा सवाल डंभारे कुटुंबाने उपस्थित केला आहे.

प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, व्यवहारासाठी कोणती कागदपत्रे वापरण्यात आली, संबंधित प्लॉटची कागदपत्रे कोणी तयार केली आणि आर्थिक व्यवहाराची संपूर्ण साखळी काय आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रक्कम परत करा, मालमत्ता जप्त करा

पीडित कुटुंबाने पत्रपरिषदेत पोलिस व प्रशासनाकडे चौघांनाही तातडीने अटक करून निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी केली. संबंधित प्लॉटशी निगडित सर्व सरकारी व खासगी कागदपत्रांची पडताळणी करावी, 10 लाख 30 हजार रुपयांचा आर्थिक माग काढून रक्कम परत मिळवून द्यावी, तसेच झालेल्या नुकसानीची कायदेशीर प्रक्रियेनुसार भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तपासात तथ्य आढळल्यास आरोपींच्या चल-अचल मालमत्तेबाबत कायदेशीर कारवाई करण्यासह या व्यवहारामागे आणखी व्यक्ती किंवा मोठे नेटवर्क आहे का, याचाही तपास करावा, अशी मागणी कुटुंबाने केली आहे.

“विश्वास ठेवून आयुष्याची कमाई प्लॉट खरेदीसाठी दिली. आता सरकारी रेकॉर्डमध्ये प्लॉटच अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे. रक्कमही परत मिळालेली नाही. पोलिस व प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” अशी मागणी सुमित डंभारे यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More