‘झिरो डिगी’, ‘बेरल’, ‘वेएर हाऊस’, ‘लूअसो’वर ‘फर्जी आधार’चा फास?

– सदर पोलिसांची धडक; प्रवेश रजिस्टर, संगणक डाटा ताब्यात—अल्पवयीनांना प्रवेश दिल्याचा संशय
– ‘रिपल’ प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून धागेदोरे; दोघे गजाआड, मालक फरार

The Exposer
नागपूर : अल्पवयीन मुला-मुलींना प्रौढ दाखविण्यासाठी आधारकार्डवरील जन्मतारखेत फेरफार करून पब, कॅफे, बिअर बार आणि हॉटेलमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. ‘रिपल पब अँड बार’ प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर सदर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत शहरातील विविध प्रतिष्ठानांच्या प्रवेश नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे.

विश्वसनियसूत्रानुसार, या तपासादरम्यान ‘झिरो डिगी’, ‘बेरल’, ‘वेएर हाऊस’ आणि ‘लुअसो’ यासह काही पब, कॅफे, बिअर बार व हॉटेलमध्ये पोलिसांनी धडक देत प्रवेश रजिस्टर आणि संगणकातील ग्राहकांचा डाटा तपासल्याची माहिती आहे. काही रजिस्टर ताब्यात घेण्यात आल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रतिष्ठानांविरुद्ध गैरप्रकार सिद्ध झालेला नसून, त्यांच्याकडील नोंदींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

‘झिरो डिगी’पासून ‘लुअसो’पर्यंत डाटा तपासणी

अल्पवयीनांच्या नावाने वय वाढवून तयार करण्यात आलेल्या आधारकार्डचा वापर नेमका कुठे झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ‘झिरो डिगी’, ‘बेरल’, ‘वेएर हाऊस’ आणि ‘लुअसो’ यासह विविध प्रतिष्ठानांमधील प्रवेश नोंदी तपासल्या. रजिस्टरमधील नोंदी, संगणकातील डाटा आणि आरोपींकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी केली जात आहे.

काही रजिस्टर जप्त करून जप्तीच्या दस्तावर संबंधित प्रतिष्ठानांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्याची माहिती आहे. या नोंदींमधून फेरफार केलेल्या आधारकार्डच्या आधारे अल्पवयीनांना प्रवेश देण्यात आला होता का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

‘फर्जी आधार’चा वापर कुठे-कुठे? ‘डाटा मॅचिंग’ सुरू

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीनांना प्रौढ दाखविण्यासाठी आधारकार्डवरील जन्मतारखेत फेरफार केला जात असल्याचा संशय आहे. या फेरफार केलेल्या कागदपत्रांचा वापर ‘झिरो डिगी’, ‘बेरल’, ‘वेएर हाऊस’, ‘लुअसो’ यासह अन्य प्रतिष्ठानांमध्ये झाला का, याची पडताळणी केली जात आहे. प्रवेश रजिस्टर, संगणक डाटा, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या मोबाईलमधील माहिती यांची सांगड घालून पोलिस तपास करत असल्याने या प्रकरणाचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

मालक-व्यवस्थापक चौकशीच्या रडारवर

संबंधित प्रतिष्ठानांचे मालक व व्यवस्थापक यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे आधारकार्डमध्ये फेरफार करणाऱ्यांपासून त्याचा वापर करून प्रवेश मिळवून देणाऱ्यांपर्यंतची संपूर्ण साखळी पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत आली आहे.

काही प्रतिष्ठान चालकांकडून ‘आम्ही केवळ आयडी पाहूनच प्रवेश देतो’ असा बचाव केला जात असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात कागदपत्रे, प्रवेश नोंदी किंवा सीसीटीव्ही फुटेजमध्ये विसंगती आढळल्यास संबंधितांची चौकशी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

‘फर्जी आधार’ प्रकरणात दोघे गजाआड; ‘रिपल’चा मालक फरार

दरम्यान, माउंट रोडवरील ‘रिपल पब अँड बार’मध्ये २१ वर्षांखालील तरुणांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आधारकार्डवरील जन्मतारखेत फेरफार केल्याच्या प्रकरणात सदर पोलिसांनी विनय फुलमाळी (२४), रा. राधेमंगलम, प्रतापनगर आणि अनुराग ऊर्फ जेरी संदीप वाघमारे (२१) यांना अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने प्रथम दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर तपासातील पुढील बाबींच्या चौकशीसाठी आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली. या प्रकरणात ‘रिपल पब अँड बार’च्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल असून तो फरार असल्याची माहिती आहे.

तपासात आरोपींकडून आधारकार्डवरील जन्मतारखेत फेरफार करून तरुणांकडून प्रत्येकी ३०० रुपये घेतल्याची माहिती समोर आल्याचे सांगण्यात येते. तसेच विविध पबांसाठी पाच टक्के कमिशनवर काम केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

१०० हून अधिक आधारकार्डमध्ये फेरफारचा संशय

या प्रकरणात गेल्या वर्षभरात १०० हून अधिक आधारकार्डमध्ये फेरफार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. फेरफार केलेली कागदपत्रे व्हॉट्सॲपवर पाठविल्यानंतर संबंधित मेसेज डिलिट केले जात असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून ‘रिपल’मधील संगणकांचीही तपासणी सुरू आहे. त्यामुळे मोबाईल आणि संगणकातील डिजिटल पुराव्यांमधून या प्रकरणातील आणखी व्यक्ती अथवा प्रतिष्ठानांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पोलिस आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

या प्रकरणाची पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पीएसआय निकेतन किल्लेदार, पोलिस हवालदार नरेश बढेल, संतोष, निलेश, अमित, कविता, ज्ञानेश्वर आदींनी ही कारवाई केली.

अल्पवयीनांना वय वाढवून दाखविणाऱ्या ओळखपत्रांच्या आधारे पब-बार हॉटेलमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रकार गंभीर असल्याने पोलिसांनी आता तपासाची व्याप्ती वाढवली आहे. ‘झिरो डिगी’, ‘बेरल’, ‘वेएर हाऊस’, ‘लुअसो’सह अन्य प्रतिष्ठानांच्या नोंदींच्या तपासातून या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात आणि आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More