विदेशी सिगारेटचा जखीरा जप्त; आरोपीस अटक

– गणेशपेठ पोलिसांची धडक कारवाई; २,८६० पाकिटांसह १०.९४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

The Exposer
नागपूर : प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पदरीत्या आढळलेल्या कारमधून तब्बल २ हजार ८६० पाकिटे प्रतिबंधित सिगारेट जप्त करण्यात आली. या सिगारेटची किंमत २ लाख ३३ हजार ८०० रुपये असून, वाहन, मोबाईल फोनसह एकूण १० लाख ९४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ ते मध्यरात्री १२ वाजताच्या दरम्यान गणेशपेठ पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी जाधव चौक ते घाट रोडदरम्यान व्यायाम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पांढऱ्या रंगाची एमएच १४ जेएम ६९९३ क्रमांकाची कार संशयास्पदरीत्या दिसून आली.

पोलिसांनी कारचालकाकडे वाहनाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तरे न देता वाहन स्वतःच्या मालकीचे नसल्याचे सांगितले. त्यानंतर पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता त्यामध्ये पाच खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले. बॉक्सची पाहणी केली असता त्यात कोणतेही वैधानिक इशारे अथवा चित्र नसलेल्या विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला.

या साठ्यामध्ये ESSE LIGHT, ESSE SPECIAL GOLD, MARLBORO आदी ब्रँडच्या एकूण २ हजार ८६० सिगारेट पाकिटांचा, अंदाजे २ लाख ३३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला.

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने आपले नाव अनिल ओमप्रकाश गौतम (वय २९, रा. विद्यानगर, पिंपरी-चिंचवड, पुणे) असे सांगितले. त्याच्याकडून सिगारेट, वाहन आणि एक मोबाईल फोन असा एकूण १० लाख ९४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीत आरोपीने ही कार केवळ चालविण्यासाठी घेतल्याचे सांगितले. तसेच त्याच्यासोबत आलेल्या लुखरे नामक व्यक्तीने मोबाईलधारकाकडून कारमध्ये बॉक्स ठेवून कुठेतरी जाण्यास सांगितल्याचे पोलिसांना सांगितले.

तंबाखूविरोधी कायद्याला हरताळ फासणाऱ्यांवर कारवाई

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा बाळगल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ अंतर्गत कलम ७(२) व २०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव आणि राम यांच्या पथकाने केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More