– बाधित प्लॉट व अतिक्रमणांवर कारवाई न करता रस्त्याला वळण देऊन रुंदी कमी केल्याचा आरोप
– वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका — बेसा-पिपळा नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल
The Exposer
नागपूर : घोगली हनुमान मंदिर ते घोगली इन्सारा सिटी या मार्गावरील प्रस्तावित/मंजूर १८ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामावरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः ओसीन सुपर सिटी परिसरात बाधित प्लॉटची आवश्यक जागा उपलब्ध करून न घेता, संबंधित अतिक्रमणांवर कारवाई न करता रस्ता सरळ नेण्याऐवजी धोकादायक वळण देऊन अरुंद करण्यात आल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या धडकांसह गंभीर अपघातांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मार्किंग झाले होते, मग रस्ता अरुंद का केला?

रुंदीकरणापूर्वी संबंधित ठिकाणी अधिकृत मार्किंग करण्यात आले होते का? झाले असल्यास त्या मार्किंगनुसार प्रत्यक्ष रस्ता विकसित का करण्यात आला नाही? १८ मीटरची मंजूर रुंदी प्रत्यक्षात कुठे आणि किती कमी झाली, आणि का? याचा खुलासा करण्याची नागरिकांची मागणी आहे. संपूर्ण मार्गाची संयुक्त मोजणी करून प्रत्यक्ष रुंदी, मंजूर आराखडा आणि विकसित रस्ता यांची पडताळणी करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
रस्त्याला वळण देण्याचा निर्णय नेमका कोणाचा?

ओसीन सुपर सिटी परिसरात रस्ता सरळ नेण्याऐवजी वळण देण्याचा निर्णय कोणाच्या आदेशाने घेण्यात आला? या बदलाला सक्षम प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता आहे का? बाधित प्लॉट किंवा जमिनीची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली का? संबंधित अतिक्रमणे अस्तित्वात असल्यास ती हटविण्यासाठी कारवाई का करण्यात आली नाही? असे थेट प्रश्न तक्रारीत उपस्थित करण्यात आले आहेत.
‘धोकादायक वळण’ ठरू नये, म्हणून Road Safety Auditची मागणी
या वळणावर वाहनचालकांना पुरेशी दृश्यमानता मिळते का, समोरून येणाऱ्या दोन वाहनांना सुरक्षितपणे क्रॉस होता येते का, वळणाची रुंदी व भूमिती वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे का आणि भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करण्यात आला आहे का, याची स्वतंत्र Road Safety Audit करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा व वाहतूक अभियांत्रिकीच्या लागू नियम, मानके आणि तांत्रिक निकषांचे पालन झाले आहे की नाही, याचीही स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासकीय व तांत्रिक जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

मंजूर १८ मीटर रस्त्याच्या आराखड्यातील तरतूद आणि प्रत्यक्ष बांधकामात तफावत आढळल्यास त्यामागील कारणे स्पष्ट करून प्रशासकीय व तांत्रिक जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय नियमबाह्य पद्धतीने झाला असल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी स्थानिक नागरिकांनी The Exposer शी बोलतांना केली आहे.
नगरपंचायत प्रशासन ‘गप्प’ का?

या संपूर्ण प्रकरणात बेसा-पिपळा नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित नगरसेवकांचे दुर्लक्ष का झाले? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
पालकमंत्री बावनकुळे यांनी लक्ष घालण्याची मागणी

१८ मीटरच्या रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी, बाधित जागा, अतिक्रमणे, वळणाची तांत्रिक वैधता आणि रस्ता सुरक्षेचे निकष या सर्व बाबींची निष्पक्ष व संयुक्त चौकशी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कागदावर १८ मीटर आणि प्रत्यक्षात अरुंद रस्ता—असा विरोधाभास असेल तर त्यामागचे कारण काय? याचे उत्तर प्रशासनाने पारदर्शकपणे देण्याची वेळ आली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















