सदरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात 16.20 लाखांची धाडसी चोरी

– सदरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात 16.20 लाखांची धाडसी चोरी; अवघ्या 3 मिनिटांत सोन्याचा ऐवज लंपास!
– शटर उघडे असल्याची संधी साधून चोरट्याची दुकानात एन्ट्री; 28 अंगठ्या, 16 मंगलसूत्र पेंडेंटसह सुमारे 135 ग्रॅम सोन्यावर डल्ला

The Exposer
नागपूर : सदर परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानात दिवसाढवळ्या झालेल्या तब्बल 16 लाख 20 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीने खळबळ उडाली आहे. दुकानाचे शटर उघडे असल्याची संधी साधत अज्ञात चोरटा दुकानात शिरला आणि अवघ्या तीन मिनिटांत शोकेसमधील सोन्याचा लाखोंचा ऐवज घेऊन पसार झाला. चोरीची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सदर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

शटर उघडे अन् चोरट्याची एन्ट्री!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धीरज महेंद्रकुमार गोलछा (45) हे सदर येथील गोलछा मार्ग, कराची गली परिसरातील रहिवासी आहेत. त्यांचे सदर परिसरात पारस ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. दुकानाच्या मागील भागात त्यांची आई, लहान भाऊ आणि बहीण राहतात. सध्या तक्रारदार कपिलनगर येथील कुकरेजा सन सिटीमध्ये राहतात.

9 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीने धीरज गोलछा यांना फोन करून दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने दुकान गाठले आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले.

फुटेजमध्ये सकाळी 8.46 ते 8.49 या अवघ्या तीन मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरटा दुकानात शिरल्याचे दिसून आले. दुकानाचे शटर उघडे असल्याचा फायदा घेत त्याने थेट शोकेसमधील ट्रेकडे मोर्चा वळवला. काही क्षणांतच त्याने सोन्याचे दागिने गोळा केले आणि दुकानातून पसार झाला.

28 अंगठ्या, 16 मंगलसूत्र पेंडेंटसह 135 ग्रॅम सोन्यावर हात साफ

चोरट्याने शोकेसमधील ट्रेमधून सुमारे 28 सोन्याच्या अंगठ्या, सुमारे 70 ग्रॅम वजनाचे 16 मंगलसूत्र पेंडेंट, तसेच सुमारे 15 ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे 135 ग्रॅम सोन्याचा ऐवज लंपास केला. चोरी गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 16 लाख 20 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध

घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आरोपी दुकानापर्यंत कसा पोहोचला आणि चोरीनंतर कोणत्या दिशेने पसार झाला, याचा माग काढण्यासाठी परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही पोलिसांकडून तपासले जात आहे.

या प्रकरणी तक्रारीवरून महिला सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी पाटील यांनी सदर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 305(ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लाखोंच्या सोन्यावर हात साफ करणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तपासाला लागली असून आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More