– चिखली-कळमना परिसरात खळबळ; घरगुती सिलिंडरच्या व्यावसायिक वापराचीही चौकशी, FIRची प्रक्रिया सुरू
The Exposer
नागपूर : शहरातील चिखली-कळमना परिसरात गॅस सिलिंडरच्या अनधिकृत साठ्यासह अवैध रिफिलिंग होत असल्याच्या संशयावरून जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाने बुधवारी धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान तब्बल ४००हून अधिक गॅस सिलिंडर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अधिकारी सागर बावरे, वैभव खैरकर आणि पुरवठा निरीक्षक प्रदीप भावे यांच्या पथकाने ९ सप्टेंबर रोजी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी केली.
गॅस सिलिंडरचे अनधिकृतरीत्या रिफिलिंग केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने घटनास्थळी धडक देत तपासणी केली. यावेळी १४.२ किलो, १९.२ किलो, ५ किलो आणि २ किलो क्षमतेचे घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर मोठ्या संख्येने आढळले.
सिलिंडरचा एवढा मोठा साठा कुठून आला?घटनास्थळी आढळलेल्या सिलिंडरचा मोठ्या प्रमाणातील साठा, त्यांचा वापर, रिफिलिंगची प्रक्रिया तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि कागदपत्रांबाबत प्रशासनाकडून सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे. रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी साधने, सिलिंडरचे प्रकार व संख्या आणि इतर संबंधित बाबींचीही पडताळणी केली जात आहे.विशेष म्हणजे घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक वापर तर होत नव्हता ना? तसेच अनधिकृतरीत्या सिलिंडर रिफिलिंग करून नागरिकांच्या जीविताशी खेळ केला जात होता का? याबाबतही प्रशासन तपास करीत आहे. याप्रकरणी सिलिंडर पुरवणाऱ्या संबंधित गॅस एजन्सी मालकावर गुन्हा दाखल होण्याची, तसेच वितरक परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















