– दोन सुवर्णपदकांसह ‘World Strong Man’चा बहुमान; Biceps Curl प्रकारात जागतिक विक्रमाची बरोबरी
The Exposer
नागपूर : नागपूर शहर पोलीस दलाचा मान आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उंचावला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार शेषराव राऊत यांचे १७ वर्षीय सुपुत्र चैतन्य शेषराव राऊत याने किर्गिझस्तान येथे झालेल्या 13th World Strength Lifting Competition मध्ये दमदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली. विशेष म्हणजे, Sub-Junior गटात ‘World Strong Man’ हा प्रतिष्ठेचा बहुमान मिळवून चैतन्यने नागपूरसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

चैतन्य राऊत हा ST. Poll College, Pipla Road, Hudkeshwar, Nagpur येथे बारावीचे शिक्षण घेत असून JEE परीक्षेची तयारी करत आहे. अभ्यासासोबतच स्ट्रेंथ लिफ्टिंगचा सराव करत त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
Biceps Curlमध्ये जागतिक विक्रमाची बरोबरी
चैतन्यच्या या कामगिरीतील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे Biceps Curl प्रकारातील त्याची कामगिरी. या प्रकारात त्याने केलेली कामगिरी जागतिक विक्रमाशी बरोबरी करणारी ठरली. त्यामुळे अल्पवयातच त्याच्या क्रीडा कौशल्याची आणि शारीरिक क्षमतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
अथक मेहनत, कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर चैतन्यने जागतिक व्यासपीठावर आपली ताकद सिद्ध केली. दोन सुवर्णपदके आणि ‘World Strong Man’चा बहुमान मिळवत त्याने भविष्यातील मोठ्या यशाची नांदीच दिली आहे.
पोलिसाच्या कर्तव्यनिष्ठेला मुलाच्या यशाची जोड
पोलीस दलात कर्तव्य बजावत असतानाच मुलाच्या क्रीडा कारकिर्दीला प्रोत्साहन देणारे पोलीस अंमलदार शेषराव राऊत यांचेही या यशाबद्दल कौतुक होत आहे. शिस्त, मेहनत आणि जिद्दीची मूल्ये आत्मसात करून चैतन्यने मिळवलेले यश हे पालकांच्या प्रोत्साहनाचेही फलित मानले जात आहे.
चैतन्यच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे नागपूर शहर पोलीस दलासह संपूर्ण नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अभ्यास आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांचा समतोल साधत त्याने युवा पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
जागतिक स्तरावर दोन सुवर्णपदके आणि ‘World Strong Man’चा किताब पटकावणाऱ्या चैतन्य राऊतचे नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी-अंमलदार, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून अभिनंदन होत असून, त्याच्या उज्ज्वल क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















