नागपुरातून दुचाकी चोरी, मध्य प्रदेशात विक्री!

– गुन्हे शाखा युनिट-६चा दणका; १९ वर्षीय वाहनचोर जेरबंद, २.४० लाखांच्या तीन ॲक्सेस जप्त

The Exposer
नागपूर : नागपूर शहरातून दुचाकी चोरायच्या आणि थेट मध्य प्रदेशात नेऊन त्यांची विक्री करायची, असा धंदा करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ने बेड्या ठोकल्या आहेत. आशुतोष रतिराम यादव (१९, रा. सुनवारा, तहसील धनोरा, जिल्हा शिवणी, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या तीन चोरीच्या ॲक्सेस दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

या कारवाईमुळे जुनी कामठी, राणाप्रतापनगर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, चोरीच्या वाहनांची मध्य प्रदेशातील विक्री साखळीही पोलिसांच्या रडारवर आली आहे.

सीसीटीव्ही तपासातून मिळाली ‘क्लू’; मुखबिराची माहिती ठरली निर्णायक

जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीची घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-६ने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिस कर्मचारी सुनील यादव आणि दिनेश महल्ले यांना आरोपीबाबत महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीची पडताळणी करून पोलिसांनी आशुतोष यादवला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नागपूर शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी करून त्या मध्य प्रदेशात नेऊन विकल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तीन पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांचा उलगडा

चौकशीत आरोपीने जुनी कामठी, राणाप्रतापनगर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली. त्यानंतर पंचांसमक्ष कारवाई करून पोलिसांनी तीन चोरीच्या ॲक्सेस दुचाकी जप्त केल्या. यामध्ये निळ्या रंगाची ॲक्सेस — MH 40 DF 5338, निळ्या रंगाची ॲक्सेस — MH 40 DG 2603, पांढऱ्या रंगाची ॲक्सेस — MH 37 AJ 2774, यांचा समावेश आहे. प्रत्येक दुचाकीची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असून, तिन्ही वाहनांची एकूण किंमत २.४० लाख रुपये आहे.

गुन्हे उघडकीस; फरार साथीदाराचा शोध

या कारवाईमुळे जुनी कामठी पोलिस ठाण्यातील BNS कलम 305(B) अंतर्गत दाखल वाहनचोरीचा गुन्हा, तसेच राणाप्रतापनगर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांतील BNS कलम 303(2) अंतर्गत दाखल वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील बलराम दुबे (१९, रा. शुक्ला नगर, जबलपूर, मध्य प्रदेश) हा फरार असून, त्याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. चोरीच्या दुचाकी मध्य प्रदेशात कोणाला विकल्या जात होत्या, या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही तपास सुरू आहे.

‘मुखबिर नेटवर्क’ ठरले पोलिसांचे प्रभावी अस्त्र

या कारवाईत गुन्हे शाखेचे कर्मचारी सुनील यादव आणि दिनेश महल्ले यांना मिळालेली गोपनीय माहिती निर्णायक ठरली. सीसीटीव्ही तपास आणि मुखबिराच्या माहितीची सांगड घालत पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल मारली आणि तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडेंच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनील यादव आणि दिनेश महल्ले यांनी ही कारवाई केली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या रात्रपाळी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More