पोलिस ठाण्यात मित्रांची तक्रार करायला गेला अन् स्वतःच हत्याकांडात अडकला!

– दारूच्या नशेत मित्रांना ‘धडा’ शिकवण्याचा डाव ठरला घातक; बेलतरोडी पोलिसांच्या सतर्कतेने मजुराच्या हत्येचा छडा

The Exposer
नागपूर : मित्रांनी मारहाण केल्याची तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात गेलेल्या तरुणाच्या संशयास्पद हालचालींमुळे तब्बल १५ दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाचा उलगडा झाला. बेलतरोडी पोलिसांनी तक्रारदाराने दाखविलेल्या घटनास्थळाचा बारकाईने तपास करत सीसीटीव्ही फुटेज पडताळले आणि तक्रारदारासह तिघांना मजुराच्या हत्या प्रकरणात अटक केली.

शंकर मनोहर उकडे (३०), रा. नांदगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा हा सुमारे २० दिवसांपूर्वी कामाच्या शोधात नागपुरात आला होता. बेलतरोडी परिसरातील बांधकाम साईटवर त्याला काम मिळाले होते. मात्र, दारूचे व्यसन असल्याने तो बांधकाम कंपनीच्या परिसराऐवजी वर्धा रोडवरील तृप्ती हॉटेल आणि विजयराज बारजवळील जंगलसदृश भागात दारू पिण्यास जात होता.

सुमारे १५ दिवसांपूर्वी शंकर दारू पिऊन मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीकडे परतत असताना सनी गायकवाड (२३, कैकाडेनगर), रोहित खुजणारे आणि तुषार खंडारे यांनी त्याला अडविल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तिघांनी त्याच्याकडील १,२०० रुपये आणि दारूची बाटली हिसकावली. शंकरने विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. तो खाली पडल्यानंतर छातीवर लाथा मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिघेही तेथून पसार झाले. दुसऱ्या दिवशी शंकरचा मृतदेह आढळल्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

मंगळवारी दुपारी सनी आणि रोहित यांनी तुषारला मारहाण केल्याचा प्रकार घडला. दारूच्या नशेत असलेला तुषार दोघांना ‘धडा शिकविण्यासाठी’ थेट बेलतरोडी पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याने दोघांविरुद्ध मारहाणीची तक्रार केली.

मात्र, ठाणेदार रविंद्र नाईकवाड यांनी तक्रार गांभीर्याने घेत तुषारला घटनास्थळ दाखविण्यास सांगितले. पोलिसांच्या वाहनातून घटनास्थळी जाताना तुषारने ज्या ठिकाणी मारहाण झाल्याचे सांगितले, ते ठिकाण शंकरच्या मृतदेहाशी संबंधित असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

सीसीटीव्हीने उघडले रहस्य

त्यानंतर पोलिसांनी शंकरच्या मृत्यूची फाईल पुन्हा तपासली आणि घटनास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज खंगाळले. फुटेजमध्ये शंकर त्या मार्गाने जाताना दिसून आला. त्यानंतर तुषार, रोहित आणि सनीही त्याच परिसरात दिसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

संशय बळावल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत शंकरच्या हत्येप्रकरणी त्यांची भूमिका समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मित्रांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या तुषारमुळेच जुन्या हत्याकांडाचा तपास पुन्हा सुरू होऊन तिघे पोलिसांच्या ताब्यात आले. ही कारवाई डीसीपी रश्मीता राव एन. यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र नाईकवाड यांच्या नेतृत्वात पीएसआय भदाणे, विजय मालोकार, सुभाष आणि राजेश तिवारी यांच्या पथकाने केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More