– महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला दिली जागतिक दिशा
– बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते अनागारिक धम्मपाल यांना १६२व्या जयंतीनिमित्त अभिवादन!
The Exposer
नागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आंदोलन उभारणारे तसेच भारतातील बौद्ध वारशाच्या पुनरुज्जीवनासाठी आयुष्य समर्पित करणारे अनागारिक धम्मपाल यांच्या १६२व्या जयंतीनिमित्त जगभरातील बौद्ध समुदाय त्यांचे स्मरण करून अभिवादन करीत आहे.
अनागारिक धम्मपाल यांचा जन्म १७ सप्टेंबर १८६४ रोजी कोलंबो येथे एका श्रीमंत ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे बालपणीचे नाव डेव्हिड हेवावितरणे होते. पुढे थियोसॉफिकल सोसायटीच्या संस्थापकांशी त्यांचा संपर्क आला. बुद्धांच्या शिकवणीने प्रभावित झाल्यानंतर त्यांनी पाली भाषेचा अभ्यास केला आणि ‘अनागारिक धम्मपाल’ हे नाव धारण केले.
बुद्धभूमी भारताकडे ओढ
सर एडविन अर्नोल्ड यांच्या The Light of Asia या पुस्तकाचा प्रभाव त्यांच्या जीवनावर मोठा पडला. त्यानंतर बुद्धभूमी भारताकडे त्यांचा प्रवास झाला. १८९१ मध्ये बुद्धगया येथे आल्यानंतर महाबोधी महाविहाराची झालेली दुर्दशा, तेथील परिस्थिती आणि कर्मकांड पाहून ते व्यथित झाले. कुशीनगर आणि सारनाथ येथील बौद्ध स्थळांची स्थितीही त्यांनी पाहिली.
याच काळात भारतातील बुद्धभूमीचा वारसा पुन्हा जागवण्याचा निर्धार त्यांनी केला. बुद्धांच्या धम्माचा प्रसार आणि बौद्ध तीर्थस्थळांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी व्यापक चळवळ उभी केली.
महाबोधी सोसायटीची स्थापना
३१ मे १८९१ रोजी महाबोधी सोसायटीची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला तिचे कार्यालय कोलंबो येथे होते; पुढे ते कोलकाता येथे हलवण्यात आले. भारतातील बौद्ध स्थळांच्या स्थितीकडे त्यांनी जगाचे लक्ष वेधले.
महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनासाठी पुढे निर्माण झालेल्या व्यवस्थेत बौद्ध प्रतिनिधित्वाचा मार्गही त्यांच्या दीर्घ प्रयत्नांशी जोडला जातो. बुद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी त्यांनी भारतासह विविध बौद्ध देशांमध्ये व्यापक जनजागृती केली.
शिकागोच्या विश्व धर्म संसदेत बौद्ध धम्माचा आवाज
१८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म संसदेत धम्मपाल यांनी बौद्ध तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे जगभरातील धर्मविचारकांचे लक्ष बुद्धांच्या शिकवणीकडे वेधले गेले.
धम्मपाल आणि स्वामी विवेकानंद यांच्यात त्या काळात संपर्क आणि मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा उल्लेख त्यांच्या जीवनचरित्राशी संबंधित कथनांमध्ये आढळतो. या काळात भारतातील विविध आध्यात्मिक परंपरांचा जागतिक व्यासपीठावर परिचय झाला.
जगभर बुद्धविचारांचा प्रसार
अनागारिक धम्मपाल यांनी भारतात महाबोधी सोसायटीच्या विविध शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. कोलकाता, बुद्धगया, सारनाथ, संकिसा, श्रावस्ती आणि दिल्ली यांसारख्या ठिकाणी बौद्ध कार्याचा विस्तार झाला.
होनोलूलू येथील श्रद्धाळू मेरी फोस्टर यांनी १९०३ ते १९१३ या कालावधीत महाबोधी सोसायटीला आर्थिक मदत केली. या मदतीमुळे बौद्ध चळवळीला बळ मिळाल्याचे नमूद केले जाते.
धम्मपाल यांनी आपल्या संपत्तीचा उपयोग शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, ध्यानकेंद्रे आणि बौद्ध कार्यासाठी केला. भारतासह अमेरिका, युरोप, जपान, बर्मा, फ्रान्स, इटली, सिंगापूर, जावा, चीन, मंचूरिया, कोरिया, इंग्लंड, स्वित्झर्लंड आणि जर्मनी आदी देशांमध्ये प्रवास करून त्यांनी बुद्धांच्या विचारांचा प्रसार केला.
सारनाथ झाले कर्मभूमी
१९०४ पासून सारनाथ हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र बनले. येथे राहून त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी व्याख्याने, प्रकाशन आणि विविध उपक्रम राबवले. श्रीलंकेत ‘महाबोधी मुद्रणालय’ सुरू करून बौद्ध साहित्याच्या प्रसारालाही त्यांनी चालना दिली.
बुद्धभूमीतच अखेरचा श्वास
बुद्धांच्या धम्माचा संदेश जगभर पोहोचविणाऱ्या या महामानवाचे २९ एप्रिल १९३३ रोजी सारनाथ, वाराणसी येथे निधन झाले. सारनाथ येथील मूलगंध कुटी परिसरात त्यांच्या अस्थींचे स्मारक आजही त्यांच्या कार्याची आठवण करून देते. असे भारतातील बौद्ध संगटनांच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक एवं संगठक, धम्मामित्र अभय रत्न बौद्ध यांनी The Exposer शी बोलतांना सांगितले.
Author: संतोष तायडे
संपादक















