‘कस्टडी डेथ’नंतर आता ४० हजारांची लाच; जरीपटका पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत!

– 40 हजारांची मागणी, तडजोडीनंतर 20 हजार स्वीकारताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात; एसीबीची ठाण्याच्या आवारातच कारवाई

The Exposer
नागपूर : ‘कस्टडी डेथ’च्या घटनेनंतर चर्चेत आलेल्या जरीपटका पोलिस ठाण्याची पुन्हा एकदा लाचप्रकरणामुळे चर्चा सुरू झाली आहे. एका व्यक्तीकडे 40 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 20 हजार रुपये स्वीकारणाऱ्या जरीपटका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पकडले. विशेष म्हणजे, पोलिस ठाण्याच्या आवारातच ही कारवाई झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

सचिन तायडे असे एसीबीच्या कारवाईत अडकलेल्या आरोपी पोलिस हवालदाराचे नाव आहे. तर त्याच्या दुसऱ्या साथीदारासही एसीबीने आरोपी केल्याची चर्चा आहे. तर या लाचेच्या रकमेत भागीदार किती? अशी उलट सुलट चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हवालदार व त्याच्या एका साथीदाराने एका व्यक्तीकडे एनसी प्रकरणात काम करून देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर 20 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी त्याने दर्शविल्याचे तक्रारीतून समोर आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने जरीपटका पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. बुधवारी रात्री सुमारे आठ वाजता 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताच हवालदार सचिन तायडे एसीबीच्या पथकाच्या जाळ्यात अडकला.

लाचेच्या रकमेत आणखी कोणाचा ‘हिस्सा’?

हवालदाराच्या अटकेनंतर आता या कथित लाचेच्या रकमेत आणखी कोणाचा सहभाग होता का, याकडे लक्ष लागले आहे. लाचेची मागणी नेमकी कोणत्या कामासाठी करण्यात आली, व्यवहारामागे आणखी कोणी होते का आणि पैशांचा पुढे कुठे वापर होणार होता, याची पडताळणी एसीबीकडून केली जात आहे. यासाठी लाचखोर आरोपी तायडे व एक साथीदार या दोघांच्या मोबाईलचा सिडिआर काढण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, जरीपटका पोलिस ठाण्याबाबत यापूर्वीही गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना चर्चेत आल्या आहेत. ‘कस्टडी डेथ’च्या घटनेनंतर आता पोलिस हवालदाराला लाच स्विकारल्याच्या आरोपात झालेली अटक, यामुळे ठाण्यातील कार्यपद्धतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर कस्टडी डेथ प्रकरणाचे तपासात पुढे काय झाले, याबाबतही आता चर्चा रंगली आहे.

ठाण्याच्या आवारातच एसीबीचा दणका

सामान्य नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई करणाऱ्या पोलिस ठाण्यातच हवालदार लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात सापडल्याने या कारवाईची गंभीर दखल घेतली जात आहे. या प्रकरणातील प्रत्येक आर्थिक व्यवहार आणि संबंधितांची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू असून, हवालदारावरील आरोपांची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या लाच कारवाई दरम्यान लाचेचे 20 हजार रुपये अचानक गायब झाल्याची परिसरात चर्चा रंगली आहे. दुसरीकडे लाचेच्या रंगात हात रंगल्याची परिसरात चर्चा होती. त्यामुळे सरकारी लाचेची रक्कम गायब केल्याप्रकरणी सुद्धा कारवाई होणार असल्याची चर्चा रात्री उशिरापर्यंत रंगली होती, हे विशेष. त्यामुळे कस्टडी डेथसंदर्भातील पूर्वीच्या घटनेबाबतचे निष्कर्ष आणि या लाचप्रकरणातील जबाबदारी स्वतंत्र तपासातून निश्चित होणे अपेक्षित असल्याचे म्हटले जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More