पोलिस असल्याचे सांगून ‘एन्ट्री’च्या नावाखाली ₹3.29 लाखांचा कथित व्यवहार?

– रेती वाहतूकदाराच्या तोंडी तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध उमरेड पोलिस ठाण्यात गुन्हा 

The Exposer 
नागपूर : आठ आरोपीनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगून रेती वाहतुकीच्या मार्गावर ‘एन्ट्री’ वजा लुटीच्या नावाखाली पैसे घेतल्याच्या कथित प्रकाराने उमरेड परिसरात खळबळ उडाली आहे. चांदुरबाजार येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने केलेल्या तोंडी तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध उमरेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे FIRमध्ये नमूद आहे. या प्रकरणात तब्बल ₹३ लाख २९ हजार ५०० रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख आहे.

फिर्यादी रौनक संजय हिमते (वय ३५) यांच्या तक्रारीनुसार, ते सुमारे २० वर्षांपासून ट्रान्सपोर्ट व्यवसायात असून, पवनी, जिल्हा भंडारा परिसरातील रेती घाटावरून शासकीय रॉयल्टी घेऊन MH-27-DT-3343 क्रमांकाच्या १२ चाकी टिपरमधून रेती वाहतूक करीत होते.

९ सप्टेंबर २०२६ रोजी रेती घेऊन तुमसर-काटोल मार्गे चांदुरबाजारकडे जात असताना शोएब असलम पठाण याने स्वतःला पोलीस असल्याचे सांगून रेती वाहतुकीबाबत विचारणा केली. या मार्गावर वाहन चालवायचे असल्यास ‘एन्ट्री’ च्या नावाखाली त्यांनी पेशाची मागणी केली. आणि पैसे न दिल्यास वाहन चालू देणार नसल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, विविध व्यक्तींच्या माध्यमातून फोन-पेद्वारे कथित आर्थिक व्यवहार करण्यात आले असून, वेळोवेळी ₹३ लाख २९ हजार ५०० रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास वाहने अडवून अवैध रेती वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत आहे.

या प्रकरणात सुरेन्द्र निकोसे, येतुनाथ डाहाणे, शोएब पठाण, अनिकेत लोनारे, शेराभाई, फैयाज रहमानी आणि प्रविण मुंडमवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(2), 204, 351(2) आणि 318(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याचे FIRमध्ये नमूद आहे. यासंदर्भात उमरेड पोलिस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जलग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ‘The Exposer’ शी बोलतांना सांगितले. यासंदर्भात उमरेडचे उप विभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव (आयपीएस) हे तपास करीत असल्याचे सांगितले जाते.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More