डॉ. आंबेडकर कॉलेजचा वाद पेटला; कर्मचाऱ्यांचा विद्यापीठात ठिय्या, सोमवारपासून कामबंदचा इशारा!

– कार्यकारी प्राचार्यांविरोधात तक्रारींचा भडिमार; चार-पाच दिवसांत कारवाई नाही तर उपोषण

The Exposer
नागपूर : डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित तक्रारींचा उद्रेक बुधवारी थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात झाला. कार्यकारी प्राचार्य डॉ. दीपा यश पान्हेकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रारींचा पाढा वाचत कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात धडक दिली. प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे यांच्या कक्षात सुमारे दोन तास चर्चा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले.

कार्यकारी प्राचार्यपदाबाबत विद्यापीठाने तातडीने निर्णय घ्यावा, तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. १५ सप्टेंबर रोजी सहसंचालक, उच्च शिक्षण, नागपूर विभाग यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मांडलेल्या तक्रारींच्या प्रती आणि अन्य निवेदनेही प्र-कुलगुरूंना देण्यात आली. यावेळी महाविद्यालय विकास विभागाचे उपकुलसचिव राजेंद्र उदखेडे उपस्थित होते.

दीड वर्षे तक्रारी, तरीही कारवाई नाही!

गेल्या दीड वर्षापासून कार्यकारी प्राचार्यांच्या कार्यपद्धतीबाबत मानसिक त्रास, प्रशासकीय अपारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन होत असल्याच्या तक्रारी केल्या जात असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व तक्रारींची विद्यापीठाने उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि त्यानंतर योग्य प्रशासकीय निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

डॉ. फुलझेले यांच्या पुनर्रुजू प्रकरणावरही सवाल

डॉ. अविनाश फुलझेले यांच्या महाविद्यालयातील पुनर्रुजू होण्याच्या प्रकरणावरही कर्मचाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कार्यकारी प्राचार्यांना देण्यात आलेली तात्पुरती मान्यता, त्यासाठी विचारात घेतलेली कागदपत्रे आणि त्यानंतर निर्माण झालेली प्रशासकीय परिस्थिती याबाबत विद्यापीठाकडून स्पष्टीकरण मागण्यात आले.

महाविद्यालयातील गंभीर तक्रारी असताना वैधानिक संस्थांच्या माध्यमातून त्यांची योग्य स्तरावर दखल का घेतली जात नाही, असा सवालही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. संबंधित अहवाल मागवून प्रकरणात सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन प्र-कुलगुरूंनी दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कुलगुरूंची भेट नाही; व्यवस्थापनाच्या बैठकीतही पोहोचले कर्मचारी

प्र-कुलगुरूंची भेट घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या उपलब्ध नसल्याने भेट होऊ शकली नाही. त्यानंतर कर्मचारी महाविद्यालयात सुरू असलेल्या व्यवस्थापनाच्या बैठकीच्या ठिकाणी पोहोचले.

संस्थेचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडण्याची कर्मचाऱ्यांची इच्छा होती. मात्र, त्यांना भेटता आले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. “आम्ही तुमचे कर्मचारी आहोत. आम्हाला फक्त १० मिनिटे बोलू द्या,” अशी आर्त विनंती करूनही भेट न झाल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण घटनाक्रमाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.

चार-पाच दिवसांची ‘डेडलाइन’; सोमवारपासून कामबंद आंदोलन?

महाविद्यालयासह ऐतिहासिक दीक्षाभूमीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी प्रशासन पारदर्शक, न्याय्य आणि कर्मचाऱ्यांशी सन्मानपूर्वक वागणारे असावे, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडली. दीर्घकाळ तक्रारी प्रलंबित राहिल्याने असंतोष वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

चार-पाच दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा कुलगुरूंची भेट घेण्यात येईल. त्यानंतर संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचा तसेच येत्या सोमवारपासून महाविद्यालयात कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. हा संघर्ष केवळ वेतनाच्या प्रश्नापुरता मर्यादित नसून डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची प्रतिष्ठा, दीक्षाभूमीचे महत्त्व, पारदर्शक प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना न्याय या मुद्द्यांसाठी असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केली.

गैर अनुसूचित जातीच्या प्राध्यापिकेला ऍट्रॉसिटीची धमकी 

महाविद्यालयातील एका महिला प्राध्यापिकासह एका शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्याला गैर अनुसूचित जाती, जमातीत असल्या करणाने कार्यकारी प्राचार्य त्यांना ऍट्रॉसिटीची धमकी देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आणि ही बाब कर्मचाऱ्यांनी प्र कुलगुरू अखिलेश पेशवे यांच्याकडे चर्चे दरम्यान सांगितली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More