गोडाऊन फोडले, लाखोंची सुपारी चोरली; कळमना पोलिसांनी टोळीच उचलली!

– कॅपिटल ट्रेडर्स चोरीप्रकरणी ५ आरोपी जेरबंद; ८५ बोऱ्या सुपारीसह दोन वाहने आणि मोबाईल असा २६.३८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

The Exposer
नागपूर : कळमना परिसरातील कॅपिटल ट्रेडर्सच्या गोडाऊनची सुरक्षा भेदून लाखो रुपयांची सुपारी लंपास करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा कळमना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान झालेल्या चोरीचा छडा लावत पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या ५० किलो वजनाच्या ८५ बोऱ्या सुपारीसह दोन चारचाकी वाहने आणि दोन मोबाईल असा एकूण २६ लाख ३८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गोडाऊन फोडून लाखोंची सुपारी गायब

शांतिनगर येथील हनीफ किडिया यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पावनगाव येथील डी.के. फार्मच्या बाजूला असलेल्या कॅपिटल ट्रेडर्सच्या गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. गोडाऊन फोडून मोठ्या प्रमाणात सुपारी आणि डी.व्ही.आर. चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. गुन्हा दाखल होताच कळमना पोलिसांच्या गुन्हेप्रकटीकरण पथकाने तपासाला वेग दिला.

सीसीटीव्हीपासून टोलनाक्यापर्यंत ‘ट्रॅकिंग’

पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, टोलनाक्यांवरील कॅमेरे आणि संशयित वाहनांच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण केले. या तपासातून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या मालवाहू वाहनाचा माग काढण्यात आला. तपासात अशोक लेलँड बडा दोस्त, क्रमांक एमएच ४९ बीझेड ९१३२ याचा वापर झाल्याचे समोर आले. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत कारवाई केली.

चोरीचा माल पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

कारवाईदरम्यान पोलिसांनी ८५ बोऱ्यांमध्ये भरलेली ५० किलो वजनाची सुपारी, किंमत १६ लाख २७ हजार ७५० रुपये, जप्त केली. यासोबतच—अशोक लेलँड बडा दोस्त मालवाहू वाहन — ₹५ लाख, महिंद्रा बोलेरो पिकअप — ₹५ लाख, दोन मोबाईल — ₹११ हजार, असा एकूण २६,३८,७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पाच आरोपी अटकेत

या प्रकरणात नितेश शिवरतन भवऱिया (३६), शुभम महेंद्र मराठे (२७), मोहम्मद शहजाद उर्फ अतिक मोहम्मद सईद (३७), मोहम्मद इरफान उर्फ बाबा मोहम्मद शमी शेख (३५) आणि अरविंद उर्फ बंटी येडा अशोक घनसुरे (३३) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यातील काही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तपासातून आणखी गुन्हे उघड होणार?

आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती तपासली जात असून, या टोळीचा आणखी कोणत्या चोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याचा तपास कळमना पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा (भापोसे) आणि सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे, पोनि (गुन्हे) करिम पठाण, पोउपनि गजानन राऊत, पोहवा प्रमोद कंगाले, विशाल भैसारे, पो.अं. नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश ग्वालवंशी, रोशन निंबर्ते आणि प्रविण इनवाते यांच्या पथकाने तपासाची कामगिरी पार पाडली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More