कत्तलीपूर्वीच पोलिसांचा ‘ब्रेक’! गड्डी गोदामात ८ गौवंश दाटीवाटीत; एक आरोपी ताब्यात, साथीदार फरार

– ९० हजारांचा गौवंश जप्त; एक आरोपी फरार, सदर पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

The Exposer
नागपूर : शहरातील गड्डी गोदाम परिसरात कत्तलीच्या उद्देशाने गौवंश जातीची जनावरे अमानुषपणे बांधून ठेवल्याचा प्रकार सदर पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला. प्रजापती बौद्ध विहारासमोरील मोकळ्या जागेत पोलिसांनी धाड टाकून ८ गाई-बैलांची सुटका केली असून, त्यांची अंदाजे किंमत ९० हजार रुपये आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याचा साथीदार फरार झाला आहे.

सदर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गड्डी गोदाम रेल्वे बोगद्याजवळ काही गौवंश कत्तलीसाठी आणून दाटीवाटीत बांधून ठेवण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक निकेतन किल्लेदार यांनी पथकासह पंचांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.

पोलिसांना घटनास्थळी लहान-मोठी एकूण आठ गौवंश जातीची जनावरे निर्दयपणे बांधून ठेवलेली आढळली. जनावरांना चारापाणी न देता अमानुषपणे ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच तेथे उपस्थित असलेले दोन इसम पसार होण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी त्यातील दुर्गेश सुरेश वर्मा (वय ३५) याला ताब्यात घेतले. तर त्याच्यासोबत असलेला दुसरा इसम पोलिसांना चकवा देऊन फरार झाला.

चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपीने सदर जनावरे कत्तलीसाठी आणण्यात आल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच ही जनावरे फरार आरोपीची असल्याची माहिती त्याने दिल्याचेही तपासात समोर आले आहे.

पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी अंदाजे ९० हजार रुपये किमतीचा आठ गौवंशाचा मुद्देमाल जप्त केला असून, जनावरांना पुढील कार्यवाहीसाठी सुरक्षित ताब्यात देण्यात आले आहे.

या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना क्रूर वागणुकीस प्रतिबंध अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा क्रमांक ४८०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

फरार आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी पिसे करीत आहेत. ही कारवाई पोउपनि निकेतन किल्लेदार, एचसी संतोष उपाध्याय, एचसी निलेश लोंढे, एचसी संदीप शेळके, एचसी अमित चेके आणि पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर वाकोडीकर या पथकाने केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More