– निवासी वसाहतीत थाटला ‘व्यावसायिक बाजार’; लॉजिंग-बोर्डिंगच्या नियमांना तिलांजली?
– शहरातील हॉटेल्सना नेमक्या कोणकोणत्या परवानग्यांची संयुक्त तपासणी होणार का?
The Exposer
नागपूर : नागपूर शहरात हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच OYO ब्रँड आणि लोगोचा अनधिकृत वापर करणाऱ्या तीन हॉटेल-लॉज मालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक कारवाई गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे. मात्र, OYOच्या नावाच्या गैरवापरावर कारवाई होत असताना शहरातील गल्लीबोळ आणि निवासी वसाहतींमध्ये सुरू असलेल्या हॉटेल-लॉजिंग व्यवसायांकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पोलिसांची थेट कारवाई; तीन ठिकाणी छापे
पोलिस विभागाच्या प्रेस नोटनुसार, OYO Hotels & Homes Pvt. Ltd.चे नोडल अधिकारी नरेंद्र सुरेश खारे (वय ४२, रा. माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) यांनी OYOचा ब्रँड व लोगो अनधिकृतपणे वापरणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी कंपनीकडून अधिकृत अधिकार मिळाल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार गुन्हेशाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अधिकारी व अंमलदारांसह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी कारवाई केली.
पोलिसांच्या कारवाईतील तीन आस्थापनामध्ये OYO Hotel ‘आनंद इन’, विहीरगाव, उमरेड रोड, OYO Hotel ‘स्पॉट ऑन फक्त तू आणि मी’, माता नगर, बहादुरा, नागपूर, OYO Hotel ‘एस के हरी’, टेलिफोन नगर, उमरेड रोड, नागपूर यांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांना पंचांसमक्ष करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान संबंधित हॉटेल मालक आरोपी OYO ब्रँड व लोगोचे नाव वापरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेल चालवत असल्याचे निदर्शनास आले.
तीन आरोपींविरुद्ध गुन्हा
या कारवाईत पोलिसांनी खुशाल विठ्ठलराव वाडेकर, चेतन मोतीराम चरडे आणि प्रज्वल हरिचंद्र कांबळे यांच्याविरुद्ध कारवाई केली. संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३४५(३), ३४७(२), २२३ तसेच व्यापार चिन्ह अधिनियम १९९९ मधील कलम १०३ व १०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.
मात्र प्रश्न केवळ OYOच्या लोगोपुरता नाही!
OYOच्या नावाचा किंवा लोगोचा अनधिकृत वापर हा कायदेशीर कारवाईचा विषय आहे. मात्र, त्याचवेळी निवासी वसाहती, गल्लीबोळ किंवा रहिवासी इमारतींमध्ये हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस किंवा तत्सम व्यवसाय सुरू असतील, तर त्या आस्थापनांकडे आवश्यक परवानग्या आहेत का? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. यामध्ये महापालिकेची आवश्यक परवानगी आहे का?, संबंधित इमारतीचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी आहे का?, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आहे का?, लॉजिंग-बोर्डिंगसाठी लागू नियमांचे पालन होते का?, ग्राहकांची ओळख व नोंद व्यवस्थित ठेवली जाते का?, CCTV व्यवस्था आणि त्याची नोंद सुरक्षित ठेवली जाते का?, पोलीस अथवा इतर संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या आहेत का?, अल्प कालावधीसाठी, विशेषतः एका-दोन तासांसाठी खोल्या वापरणाऱ्या ग्राहकांच्या नोंदी व पडताळणीची व्यवस्था काय आहे?
‘OYO’चा बोर्ड तपासला; आता परवानग्यांचे बोर्डही तपासा!
एका बाजूला गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून OYOच्या ब्रँडचा अनधिकृत वापर करणाऱ्या आस्थापनांवर थेट कारवाई होत आहे. दुसऱ्या बाजूला शहराच्या विविध भागांत हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस आणि होम-स्टेच्या नावाखाली नेमका कोणता व्यवसाय सुरू आहे आणि तो कोणत्या परवानगीच्या आधारे सुरू आहे, याची व्यापक तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. याविषयींही पोलिसांकडून धडक कारवाई होण्याची मागणी नागरिकांमधून पुढे आली आहे.
त्यामुळे महापालिका, पोलीस विभाग आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्तपणे शहरातील हॉटेल-लॉजिंग आस्थापनांची परवानगी, वापराचा प्रकार, अग्निसुरक्षा आणि इतर वैधानिक बाबी तपासून त्याची माहिती सार्वजनिक करणार का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलिसांच्या कारवाईमुळे अपेक्षा वाढल्या
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दर्शन पाटील व त्यांच्या पथकातील अधिकारी-अंमलदारांनी केली.
यासह शहरात अवैध धंद्यांविरोधातील कारवाईचे सत्र सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर OYOच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर झालेली ही कारवाई निश्चितच लक्षवेधी आहे. मात्र, आता त्याच धर्तीवर शहरातील हॉटेल-लॉजिंग व्यवसायांची वैधता आणि आवश्यक परवानग्यांचीही तपासणी होणार का? हा प्रश्न कायम आहे. OYOचा लोगो अनधिकृत असेल तर कारवाई होते; मग नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या हॉटेल-लॉजिंग व्यवसायांकडे दुर्लक्ष का? आणि असेल तर अभय कुणाचे? असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जातं आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















