बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विचारांचा जागर; २५ सप्टेंबरला कर्तृत्ववानांचा गौरव

– शतकोत्तर महोत्सवात सामाजिक पत्रकारिता, धम्मप्रचार आणि आंबेडकरी चळवळीतील योगदानाचा सन्मान

The Exposer
नागपूर : महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिलेले बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त २५ सप्टेंबर रोजी शतकोत्तर महोत्सव व कर्तृत्ववानांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सिद्धार्थनगर, नागपूर येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात हा कार्यक्रम होणार असून ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आर्कि. परमानंद रामटेके अध्यक्षस्थानी राहणार आहेत. आमदार तथा माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रख्यात चित्रकार प्रकाश जंजाळ, आंबेडकरी विचारवंत देविदास घोडेस्वार आणि प्रा. गौतमी खोब्रागडे-डोंगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याला पुढे नेण्यात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यसभेत असताना त्यांनी दलित, पीडित, शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर आवाज दिला. त्यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याच्या उद्देशाने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानतर्फे जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्तृत्ववानांचा होणार सन्मान

या सोहळ्यात प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर यांना ‘बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्मृती जीवन गौरव पुरस्कार’, केवल जीवनतारे यांना ‘प्रा. रणजित मेश्राम सामाजिक पत्रकारिता पुरस्कार’, सूर्यभान शेंडे यांना ‘बाबू हरदास एल.एन. आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’, तर भदंत आनंद कौशल्यान, धम्मप्रचारक, बी.डी.एस. संघ, नागपूर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची माहिती संयोजक एन.टी. मेश्राम व भीमराव वैद्य यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र गायकवाड, डॉ. प्रा. सुदेश भोवते, राजन वाघमारे, सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More