गोवंश तस्करीवर क्राईम ब्रांचचा घणाघात!

– ७९ गोवंशांची सुटका; दोन कारवायांत तब्बल ७४.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : गोवंश तस्करीविरोधात नागपूर क्राईम ब्रांचच्या भूमाफिया विरोधी पथकाने धडक कारवाई करत ७९ गोवंशीय जनावरांची सुटका केली. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी दोन ट्रक, बोलेरो पिकअपसह अन्य वाहने आणि एकूण ७४.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना बिडगाव येथील गोशाळेत सुरक्षितपणे पाठविण्यात आले.

डेअरी फार्मवर छापा; ७६ गोवंश ताब्यातून मुक्त

पहिली कारवाई २७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.५० ते सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान गादा-नेरी रोडवरील गादा शिवारातील हनी डेअरी फार्मवर करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत फार्मवर छापा टाकला.

यावेळी एमएच-४०-एएन-७५१७ क्रमांकाच्या टाटा मोटर्स ट्रकमध्ये २१, तर एमएच-४०-बीजी-४०७६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २६ गोवंशीय जनावरे आढळून आली. याशिवाय फार्म परिसरात आणखी २९ गोवंश बांधून ठेवण्यात आले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, या जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था न करता कथितरीत्या अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आले होते. त्यांना कत्तलीसाठी नेण्याची तयारी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

या कारवाईत एकूण ७६ गोवंशांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी दोन ट्रक, स्प्लेंडर मोटारसायकल, अ‍ॅक्टिव्हा मोपेड आणि विनानंबरची पांढरी अ‍ॅक्टिव्हा असा सुमारे ६४.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हनी डेअरी फार्म संचालकासह अनेकांवर गुन्हा

या प्रकरणी हनी डेअरी फार्मचा संचालक मोहम्मद आसिम, दोन्ही ट्रकचे मालक, चालक आणि क्लीनर यांच्याविरुद्ध नवीन कामठी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे.

कारवाई करून परतत असतानाच पुन्हा ३ गोवंश आढळले

पहिली कारवाई पूर्ण करून क्राईम ब्रांचचे पथक परतत असतानाच सकाळी सुमारे ९.१५ वाजता गादा-नेरी रोडवरील ठाकरे पोल्ट्री फार्मसमोर बोलेरो पिकअप क्रमांक एमएच-४०-बीएल-५००९ संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन गोवंशीय जनावरे ठासून आणि बांधून ठेवण्यात आल्याचे आढळले.

चौकशीत चालकाने आपले नाव आकाश मदन इलमे (२८), रा. भोसा, ता. मोहाडी, जि. भंडारा असे सांगितले. वाहन मालक अंकुश हटवार (३५), रा. आंबागड, ता. मोहाडी, जि. भंडारा असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, ही जनावरे विक्रीसाठी हनी डेअरी फार्मच्या संचालक मोहम्मद आसिम यांच्याकडे पाठविण्यात आली होती. या कारवाईत बोलेरो पिकअपसह तीन गोवंश असा सुमारे ९.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीनही गोवंशांना बिडगाव येथील गोशाळेत हलविण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, डीसीपी डिटेक्शन दीपक अग्रवाल आणि एसीपी क्राईम वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भूमाफिया विरोधी पथक व क्राईम ब्रांच युनिट-१च्या पथकाने केली. कारवाईत संजीवनी थोरात, प्रशांत ठवरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. ७९ गोवंशांची सुटका आणि ७४.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त झाल्याने गोवंश तस्करीविरोधातील ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More